समृद्धी महामार्गावर दारुचा अड्डा! 25 जणांनी जीव गमावलेल्या ठिकाणापासून काही अंतरावर सर्रास मद्यविक्री
Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका सुरुच असल्याचे पाहायला मिळत आहे. समृद्धी महामार्गावर काही दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात 25 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता या महामार्गाचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
मयुर निकम, झी मीडिया, बुलढाणा : समृद्धी महामार्गावर (samruddhi highway) राजरोसपणे अवैधरित्या दारूविक्री केली जाते असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. काही पैशांखातर लोकांच्या जिवाशी खेळ केला जात आहे. बुलढाणा (buldhana bus accident) जिल्ह्यातील समृद्धी महमार्गावर मागील महिन्यात झालेल्या भीषण अपघातात 25 जणांनी प्राण गमावले आहेत. त्यानंतर या महामार्गावरील एक धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. समृद्धी महामार्गावर राजरोसपणे अवैधरित्या दारूविक्री केली जात असल्याचे समोर आलं आहे. झी 24 तास इन्व्हेस्टिगेशनमध्ये याचा पर्दाफाश झाला आहे.
बुलढाण्यात बस अपघातात 25 जणांचा मृत्यू
अपघाताची अनेक कारण तर आहेतच शिवाय दारु हे देखील यातील प्रमुख कारण आहे. 1 जुलैला बुलढाण्यात झालेल्या बस अपघातात 25 जणांचा मृत्यू झाला होता. चालकानं दारु प्याल्यानं हा अपघात झाल्याचं तपासात उघड झालं होतं. त्यात आता समृद्धीवर दारु विक्रीचा अड्डाच असल्याचं धक्कादायक वास्तव झी 24तासच्या इन्व्हेस्टिगेशन रिपोर्टमधून समोर आलं आहे.
बुलढाणा अपघातानंतर या महामार्गावरील एक धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. समृद्धी महामार्गावर राजरोसपणे अवैधरित्या दारूविक्री केली जात आहे. काही पैशांखातर लोकांच्या जिवाशी खेळ केला जात आहे. झी 24 तास इन्व्हेस्टिगेशनमध्ये याचा पर्दाफाश झालाय.
1 जुलैची ती भयभीत करणारी पहाट आठवली की अंगावर काटा येतो. समृद्धी महामार्गावर खासगी बसला भीषण अपघात झाला आणि 25 जणांनी आपले प्राण गमावले. या अपघाताला जबाबदार असलेल्या चालकाच्या रक्ताच्या नमुन्यात अल्कहोल आढळून आलं होतं. अपघातानंतर समृद्धीतल्या त्रुटीवर, मानवी चुकांवर खल झाला. मात्र उपाय शून्यच...झी 24 तासनं याच्याच मुळाशी जात अपघाताची कारणं शोधून काढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा जिथं विदर्भ एक्स्प्रेसचा अपघात झाला तिथून अवघ्या 10 किमी अंतरावर असलेल्या एका ढाब्यावर चक्क देशी दारूची विक्री होत असल्याचं समोर आलं आहे. दारू विकणाऱ्या या ढाबेवाल्यालांना कायद्याची भीती, ना कुणाच्या जिवाची पर्वा...काही पैशांखातर लोकांच्या जिवाशी अक्षरश: खेळ सुरूंय. त्यामुळे समृद्धी महामार्गावरच्या दारूविक्रीनं अनेक सवाल उपस्थित होत आहेत.
अशा प्रकारे एका ढाब्यावर अवैधरित्या सर्रासपणे दारू विकली जात असताना समृद्धी प्रशासन गप्प का? या दारूविक्रीला अधिकारी आणि पोलिसांचा आशीर्वाद आहे का? 1 जुलैच्या अपघातानंतर प्रशासनानं नेमका कोणता धडा घेतला? की प्रशासन आणखी एका मोठ्या अपघाताची वाट पाहतंय? अपघातांच्या मालिकेमुळे समृद्धी महामार्ग कुप्रसिद्ध होऊ लागलाय. त्यात आता इथं राजरोसपणे दारूविक्रीचे प्रकार घडत असतील महामार्गावरील अपघात खरच रोखले जातील का? हाही एक मोठा प्रश्नच आहे.