अमर काणे, झी मीडिया, नागपूर : पत्नी आणि मुलीची हत्या करत कुटुंब प्रमुखाने आत्महत्या केल्याची घटना नागपूरमध्ये समोर आली आहे. नागपूर जिल्ह्यातल्या एमआयडीसी पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या सरोदी मोहल्ल्यात ही धक्कादायक घटना घडली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विलास चंपतराव गवते असं या व्यक्तीचं नाव आहे. विलास गवते यांचा दुग्ध व्यवसाय करत होते. त्यांची आर्थिक परिस्थितीही चांगली होती. त्यांच्याकडे १० दुभती जनावरं होती आणि दुधाचा व्यवसायही चागंला चालत होता. 


पण विलास गवते यांचा स्वभाव काहीसा रागीट होता. त्यातच ते पत्नीवर संशय घेत होते. तिला घराबाहेर जाण्यासही त्यांनी बंदी घातली होती. इतकंच काय तीला कुणाशी बोलूही देत नव्हते. या गोष्टीमुळे घरात अनेकदा वादही झाले. गेल्या काही महिन्यांपासून विलास गवते मानसिकरित्या खचले होते अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.


शुक्रवारी मध्यरात्री सर्व कुटुंब गाढ झोपेत असताना विलास गवते उठले आणि त्यांनी पत्नी रंजा हीची गळा चिरुन हत्या केली. पण पत्नीची हत्या करत असताना 10 वर्षांच्या मुलीला जाग आली. तीने घडलेला प्रकार पाहिला. त्यामुळे घाबरलेल्या विलासने मुलीचीही गळा चिरून हत्या केली.  जवळच झोपलेल्या 12 वर्षांच्या मुलीला आणि मुलाला मात्र त्याने काहीही केलं नाही.


पत्नी आणि मुलीची हत्या केल्यानंतर विलासने घरातील अंगात असलेल्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. पहाटे जागा झालेल्या मुलाने आई आणि बहिणीला रक्ताच्या थारोळ्यात पाहिलं. घाबरलेल्या मुलाने शेजारी राहणाऱ्या नातेवाईकांना ही घटना सांगितली. नातेवाईकांनी विलासचा शोध घेतला त्यावेळी त्याचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला.


नातेवाईकांनी या सर्व घटनेची माहिती पोलिसांना दिली. आर्थिक स्थिती चांगली असूनही एकलकोंडा स्वभाव, आपल्या मनातली गोष्ट कोणाला न सांगणे या सवयीमुळे विलास मानसिक तणाव गेले. त्यातच पत्नीवरील शंकेपायी घरातलं वातावरण बिघडत गेलं. यातूनच विलास यांनी टोकाचं पाऊल उचलत हसत खेळत असलेल्या कुटुंबाची स्वतःच राखरांगोळी केली.