निलेश वाघ, झी मीडिया, मालेगाव : ज्ञानदानासारखे पवित्र काम करणाऱ्या शिक्षक आणि गुरुजनवर्गाचा नवीन 'फंडा' सध्या मालेगावात चर्चेचा विषय बनला आहे. मालेगाव महापालिकेने आता या शिक्षकांवर कारवाई सुरू केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लाखभर पगार असतांना केवळ 1500 रुपये देऊन भाडोत्री शिक्षकाची नेमणूक करायची, आणि स्वत: घरात बसून पूर्ण पगार घ्यायचा असा प्रकार मालेगाव महापालिका शिक्षण मंडळाच्या एका उर्दू शाळेत सुरु आहे.


या शाळेत तपासणी करण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना हा धक्कादायक प्रकार आढळून आला आहे. या शाळेत महिन्याकाठी पंधराशे रुपयांवर दोन भाडोत्री शिक्षकांची नेमणूक करण्यात आली होती. हे दोन शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवत असताना आढळून आले. ज्या शिक्षकांनी अशा प्रकारचे कारनामे केले आहेत, त्या शिक्षकांविरोधात महापालिकेने कारवाई करण्याचा अहवाल पाठवला आहे. 


शाळेतील शिक्षकांनी मात्र असा कोणताही प्रकार शाळेत घडला नसल्याचं म्हटलं आहे. 


दरम्यान एकीकडे बोगस शिक्षकांवर कारवाई सुरू असतानाच मालेगावच्या अब्बासनगर भागातील ऊर्दू शाळा क्रमांक 5 चे शिक्षक हमीद महेवी यांचा आकस्मित मृत्यू झाला. काही राजकीय व्यक्ती शाळेच्या कामकाजाची माहिती घेत असताना महेवी यांना अचानक त्रास जाणवू लागला. त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. या घटनेमुळे शिक्षकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. मात्र याबाबत अद्याप कुठलीही तक्रार दाखल करण्यात आली नाही.