विष्णू बुरगे, झी मीडिया, बीड :  बीड शहरातील एका महिलेच्या वाट्याला दु:ख ऐकाल तर तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. ती दिसायला सुंदर होती इतकीच तिची चूक होती. सुंदर दिसते म्हणून तिच्या पतीने तिला गेली चार वर्ष खोलीत डांबून ठेवलं. इतकंच नाही तर तिला जबर मारहाणही केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बीड शहरातील जालना रोड भागात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रुपाली किन्हीकर असं या पीडित महिलेचं नाव असून तिला दोन मुलं आहेत. घरात राहून मरण यातना भोगणाऱ्या या महिलेची सामाजिक कायकर्त्यांच्या मदतीने पोलिसांनी सुटका केली. यावेळी तिची अवस्था पाहून पोलीस आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या डोळ्यातही पाणी आलं. 


काळीज पिळवटून टाकणारी व्यथा
बीड शहरातील जालना रोड शेजारी राहणाऱ्या रूपाली मनोज किन्हिकर या महिलेचं 20 वर्षांपूर्वी मनोज किन्हीकरशी लग्न झालं. सुंदर आयुष्याचे स्वप्न उराशी बाळगून संसाराला सुरुवात झाली, सुरुवातीची दोन-तीन वर्ष आनंदात गेली. पण  त्यानंतर चारित्र्यावर संशय घेऊन पतीने त्रास द्यायला सुरुवात केली. 


रुपाली एका दुकानात कामाला जात होती. मात्र पतीला माझ्यावर संशय आल्याने त्याने तिचं कामावर जाणं बंद केलं. त्यानंतर मनोजने रुपालीचं घराबाहेर पडणंही बंद करुन टाकलं. रुपाली सांगते, पाच-सहा वर्षांपूर्वी घराबाहेर पडले होतं. पण त्यानंतर बाहेरचं जगच बघितलं नाही असं रुपालीने सांगितलं. 


इतकंच नाही तर वडीलांच्या अंत्यविधीला रुपालीला जाऊ देण्यात आलं नाही. पत्नीबरोबरच दोन मुलांनाही मनोजने खूप त्रास दिला. रुपाली नावा सारखीच रुपाने सुंदर होती, पण या नराधमाने तिचे हाल केले. तरुणपणातच ती 80 वर्षांची दिसू लागल्याचं शेजारच्यांनी सांगितलं.


रुपाली दिसायला सुंदर असल्यामुळे तिचा नवरा तिच्यावर संशय घेत होता. गेल्या 17 वर्षांपासून तिला मारहाण करत घरात डांबून ठेवलं रूपालीच्या अंगावरती अनेक जखमा आहेत, महिलेला चालता येत नाही.


शिवाजी नगर पोलिस स्टेशनला तक्रार आल्यानंतर प्रत्यक्ष घटनास्थळी गेले. त्या घरात माणूस पाच मिनिटं देखील थांबू शकत नाही इतका उग्र वास त्या घरात येत होता. अशा ठिकाणी पीडित महिला आणि तिची दोन मुलं राहात होती. पोलिसांनी या महिलेची सुटका केली असून तिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 


पुरोगामी समजणाऱ्या महाराष्ट्रात आज देखील महिलांवरील अत्याचार कमी झालेले नाहीत. बीडमधला हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर खरंच माणुसकी जिवंत आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या नराधमास कठोर शिक्षा केली जावी अशी मागणी  सामाजिक कार्यकर्ते आणि शेजारी करत आहेत.