आशीष अम्बाडे, झी मीडिया, चंद्रपूर :  अतिशय धक्कादायक बातमी. वाढदिवसासाठी स्पार्कल मेणबत्ती आणणार असाल तर सावधान. कारण चंद्रपुरात एक धक्कादायक घटना घडलीय. वाढदिवसच्या एका सोहळ्यात स्पार्कल मेणबत्तीचा स्फोट झाला. या दुर्घटनेत दहा वर्षांच्या एका मुलाचा गाल आणि जीभ फाटली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चिमूर तालुक्यातल्या भिसी गावात हा धक्कादायक प्रकार घडला. आरंभ डोंगरे हा दहा वर्षाचा मुलगा एका मित्राच्या घरी वाढदिवसाला गेला होता. केक कापताना मेणबत्ती पेटवून झाल्यानंतर चार तासांनंतर आरंभ स्पार्कल मेणबत्ती हाताळत होता. त्याचवेळी या मेणबत्तीचा स्फोट झाला. हा स्फोट एवढा भयानक होता की त्यामध्ये आरंभची गाल आणि जीभ फाटली.


तब्बल 5 तासांची शस्त्रक्रिया केल्यानंतर आरंभचा गाल आणि जीभ जोडण्यात आली. पण त्यासाठी तब्बल दीडशे टाके पडले. 


भिसी या छोट्या गावात राहणारे विनोद , वैशाली आणि  दहा वर्षीय आरंभ हे त्रिकोणी डोंगरे कुटुंब. तिघेही गावातच आपल्या मित्राकडे असलेल्या एका वाढदिवसानिमित्त गेले होते. मुलं आसपास खेळत असताना आरंभ डोंगरे हा दहा वर्षाचा मुलगा स्पार्कल मेणबत्तीशी खेळत होता. तितक्यात मेणबत्तीचा मोठा स्फोट झाला. आरंभला रक्तबंबाळ अवस्थेत 50 किलोमीटर दूरवरच्या ब्रह्मपुरी या तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या आस्था रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 


रक्तस्त्राव अधिक झाला असल्याने आणि वय कमी असल्याने डॉक्टरांसमोर मोठं आव्हान होतं. मात्र प्लास्टिक सर्जन असलेले डॉ. श्रीकांत पेरका, डॉ. सुमित जयस्वाल आणि डॉ. पंकज लडके यांच्या अथक परिश्रमाने 5 तास शस्त्रक्रिया करण्यात आल्या. आरंभला दीडशे टाके लावल्यानंतर गाल आणि जीभेवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.


त्यामुळे मुलांनो आणि पालकांनो, स्पार्कल मेणबत्ती आणणार असाल तर सावध राहा.