जितेंद्र शिंगाडे, झी मीडिया, नागपूर : नो पार्किंगमध्ये गाडी ठेवल्यास अशा गाड्यांवर हमखास कारवाई करा, असे जाहीर निर्देश केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिले. यानंतर शहरातल्या पार्किंगची समस्या अधोरेखित झाली. पार्किंगची समस्या केवळ एका शहरापुरती मर्यादीत नाही तर ही समस्या देशातल्या जवळपास सर्वच शहरात दिसून येत आहे. शहरातील वाढती लोकसंख्या आणि त्या अनुषंगाने वाढणारी वाहनांची संख्या ही एक मोठी समस्या झालीय. रस्त्यात वेडीवाकडी पार्क केलेली वाहनं त्यामुळे होणारं ट्रॅफीक जॅम ही समस्या नवी नाही. वाहनधारकांना वाहतुकीचे नियम पाळायची शिस्त लागावी यासाठी वाहतूक विभागाकडून अनेकदा कारवाईही करण्यात येते मात्र पार्किंगची समस्या सुटत नाही. 


फोटो काढून संबंधित यंत्रणेला पाठवला


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता रस्त्यावर जर नो पार्किंगच्या ठिकाणी कोणी गाडी पार्क केली असेल, तर फोटो काढून संबंधित यंत्रणेला पाठवला तर फोटो पाठवणाऱ्यास दंडातली काही रक्कम बक्षीस म्हणून देण्यात येईल अशी माहिती गडकरींनी दिली. अधिका-यांना काही निवडणूक लढवायची नाही त्यामुळे त्यांनी बिनधास्त कारवाई करावी असा टोलाही ग़डकरींनी मारला


पार्किंगची जागाच उपलब्ध नाही, एक वास्तव


मात्र रस्त्यावर कोणी हौसेने वाहने उभी करत नाही, ही त्यातली दुसरी बाजू. वाहनसंख्या वाढली, मात्र पार्किंगची जागाच उपलब्ध नाही हे देखील एक वास्तव आहे. त्यामुळे पोलिसांनी केवळ दंड आकारणे हे काही या समस्येचं निराकरण नाही. नागपूरचा विकास आराखडा 2000 साली तयार झाला. आता 18 वर्षांनंतर त्यात बदल करणं गरजेचं आहे. 


ट्रॅफीक जॅम, अपघात, प्रदूषण, पार्किंग या समस्यांवर उद्भवणाऱ्या घटकांवर कारवाई होणं गरजेचं आहेच. पण त्यापेक्षाही समस्येचं निराकरण करण्यासाठी ठोस उपाययोजनाही गरजेच्या आहेत.