अमर काणे, झी मीडिया, नागपूर : कोरोनाची लागण झाली असेल तर संबंधित व्यक्तीला वास येण्याची किंवा चव लागण्याची क्षमता कमी होते. कोरोनाचं हे लक्षणंच मानलं जातंय. मात्र नागपूरात एका तरूणाला कोरोना होऊन गेल्यावरही वास न येण्याची समस्या उद्भवलीये. इतकंच नाही तर इतर कोणतीही खाण्याची कोणतीही गोष्टी आणली तर त्याला त्यामधून दुर्गंधी येत असल्याची त्याची तक्रार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खाण्याच्या पदार्थामधून दुर्गंध येत असल्याने तसंच चव गेल्याने त्याला काही खाताही येत नसल्याची बिकट परिस्थिती ओढवली आहे. कोरोनातून बरं झाल्यानंतर नऊ महिन्यांपासून नागपुरातील ऋषी दुबे हा तरुण parosmia या समस्येच्या दुष्टचक्रात अडकला आहे. जेवणात कोणताही  पदार्थ, अगदी चहात आलं टाकलं तरी त्याला त्याचा विचित्र वास येत असल्याचं त्याचं म्हणणं आहे. मंदिरातील उदबत्तीचा देखील गंध त्याला असह्य होतोय.


गेल्या नऊ महिन्यांपासून त्याचं जगणं या त्रासाने कठीण झाले आहे. इंजिनिअर असलेला ऋषी उत्कृष्ट शेफही आहे. मेक्सिकन, इटालियन फुड तो कोरोना होण्यापूर्वी घरी कुटुंबियांसाठी बनावयचा. मात्र पोस्ट कोविड त्याला जेवणाच्या पदार्थांतून दुर्गंध येत असल्याने तो काही खाद्य पदार्थ बनवणं तर दूरच काही खायचा पदार्थ बनत असेल तर त्या पदार्थांचा त्याला असह्य वास येतो. गेल्या नऊ महिन्यांपासू पनीर आणि दोन तीन गंध नसलेले पदार्थ खाऊन पोट भरतोय.


दरम्याम त्रास अधिकच होत असल्याने त्याने डॉक्टरांकडे धाव घेतली. नागपुरातील अनेक डॉक्टरांकडे त्याने यासंबंधी उपचार घेतले. आता न्युरोसर्जन डॉक्टर मिंलिद देवगांवकर यांच्याकडे त्याचे उपचार सुरु आहेत. 


यासंदर्भात झी 24 तासशी बोलताना न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर मिलिंद देवगावकर म्हणाले, "कोरोनामध्ये गंध जाण्याची समस्या रूग्णांमध्ये दिसून येते. कोरोनामुळे नाकातून मेंदूपर्यंत जाणाऱ्या पेशींचं नुकसान होतं. यामध्ये रिकव्हरी दरम्यान पेशींची यंत्रणा पूर्ववत होत नाही. त्यामुळे वासाची योग्य ती संवेदना न जाता चुकीची संवेदना मेंदूपर्यंत पोहोचते."


parosmia मध्ये वास आणि चव या दोघांवरही परिणाम होत असल्याने व्यक्तीची खाण्याची इच्छा कमी होणं तसंच मानसिक आरोग्यावरही परिणाम होताना दिसतो. त्यामुळे एकंदरीत याचा शरीरावरही काही प्रमाणात परिणाम होत असल्याचं डॉ. मिलिंद यांनी सांगितलंय. 


कोरोनामुळे तब्बल नऊ महिन्यांपासून गंध आणि चव हरपलेली ऋषी दुबेची केस दुर्मिळ असल्याचं डॉक्टर म्हणतायत. पोस्ट कोविड नऊ महिन्यापासून चव व वास गेलेला ऋषी उपाचारासाठी आलेला पहिला असा रुग्ण असावा असं डॉक्टर  डॉक्टर मिंलिद देवगांवकर सांगताय. ऋषीचे या त्रासामुळे गेल्या नऊ महिन्यात दहा किलो वजन घटलंय.