बीडमध्ये बहीण भावाचं मनोमिलन; निवडणूक जिंकण्यासाठी शरद पवार गट कोणता डाव खेळणार?
निवडणूक आली की पराभवानंतर प्रत्येक वेळी पंकजा मुंडे यांचे नाव चर्चेत येतं मात्र त्यांना शेवटच्या क्षणाला हुलकावणी मिळते त्यामुळे निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा त्यांचं नाव चर्चेला आलं असल्याने त्यांना तिकीट मिळणार का याकडेही सर्वांचे लक्ष आहे.
विष्णू बुरगे, झी मीडिया, बीड : 2009 पासून भाजपच्या ताब्यात असलेला बीड हा मतदार संघ आजही भाजपचा गड मानला जातोय. यामुळे मुंडे भगिनींचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. बीडमध्ये बहिण भावाचं मनोमिलन झाले आहे. यामुळे निवडणुक जिंकण्यासाठी शरद पवार गट कोणता डाव खेळणार याकडे देखील लक्ष लागले आहे. ताज्या आकडेवारीनुसार 18 लाखांहून अधिक मतदार संख्या असलेल्या बीड लोकसभा मतदारसंघात मराठा ओबीसी ओबीसी मध्ये वंजारा समाज आणि धनगर समाज निर्णय भूमिकेत असतो. उमेद्वारी मिळाली तर मुंडे भगिनींना वंजारा समाज आणि धनगर समाज साथ देणार का अशी चर्चा रंगली आहे.
बीडचं राजकीय गणित
2004 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले जयसिंग गायकवाड यांनी निवडणूक जिंकली होती. मात्र, त्यानंतर 2009 मध्ये स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी निवडणूक लढवली आणि बीडमध्ये भाजपचे कमळ फुलले आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे रमेश आडसकर यांचा पराभव झाला. त्यानंतर 2014 साली पुन्हा गोपीनाथ मुंडे यांनी निवडणूक लढवली आणि यामध्ये देखील त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार सुरेश धस यांचा पराभव करत विजय मिळवला. मात्र, त्यांच्या अपघाती निधनानंतर त्यांची कन्या डॉक्टर प्रीतम मुंडे या निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आणि मोठ्या फरकाने विजयी झाल्या. 2019 ला पुन्हा एकदा त्या निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या विरोधात दीड लाखांहून अधिक मताधिक्क्याने त्यांचा विजयी झाल्या.
2019 मध्ये झालेल्या बीड मधील सहापैकी परळी, माजलगाव, आष्टी, बीड या मतदारसंघांमध्ये धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वामध्ये चार जागांवरती राष्ट्रवादी काँग्रेसनं वर्चस्व कायम ठेवलं, तर पंकजा मुंडे यांना धनंजय मुंडे यांच्या विरोधात परळी मध्ये पराभव पत्करावा लागला भाजपच्या ताब्यात फक्त केज आणि गेवराई हे दोनच मतदार संघ राहिले.
संडे टू मंडे गोपीनाथ मुंडे या घोषणा गोपीनाथ मुंडे असताना असायच्या या घोषणा पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांनी सक्रिय राजकारणात उतरल्यानंतर बदलत गेल्या. धनंजय मुंडे प्रत्येक निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांच्या विरोधात असायचे मात्र या दोघा बहिण भावाचं मनोमिलन झाल्यामुळे ही निवडणूक आता एकतर्फी होईल की शरद पवार मराठा चेहरा देऊन आव्हान निर्माण करतील.
वर्षानुवर्ष लोकसभेसह प्रत्येक निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजप असा सामना रंगत होता मात्र सत्ता समीकरणाच्या बदलानंतर अजित पवार गट आणि भाजपा एकत्रितपणे उमेदवार देणार असल्यामुळे इथं भाजप जागा लढवेल अशी परिस्थिती आहे. मागील दोन टर्म डॉक्टर प्रीतम मुंडे या या मतदारसंघांमध्ये विजयी झाले आहेत तर यावेळी मात्र प्रीतम मुंडे यांच्यासह पंकजा मुंडे यांचे देखील नाव चर्चेत आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार या पक्षाकडून नरेंद्र काळे ईश्वर मुंडे सुशीला मोराळे यांचे नाव चर्चेत आहे. याशिवाय प्रकाश आंबेडकर यांनी बीडमधून निवडणूक लढवावी असा देखील आग्रह कार्यकर्त्यांनी धरलाय.
प्रत्येक निवडणुकीमध्ये एकमेकांच्या विरोधात असलेले मुंडे बहीण भावाचे मनोमिलन झालं आहे. त्यामुळे ही निवडणूक मुंडे भगिनींना सोयीची जाणार असल्याचं बोललं जात आहे. मात्र पंकजा मुंडे यांना उमेदवारी मिळणार की प्रीतम मुंडे याच उमेदवार असणार याबाबत मात्र मतदारसंघांमध्ये देखील संभ्रम आहे. तर वाटाघाटी मध्ये आपल्याला मतदारसंघच राहिला नसल्याचं पंकजा मुंडे या अगोदर देखील म्हणाल्यात. त्यामुळे पुढचा तिढा सोडवण्यासाठी पंकजा मुंडे यांना लोकसभेच्या रणांगणात भाजप उतरवणार का याची देखील चर्चा सुरू आहे.
काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि शिवसेना यांच्याकडून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला बीडची जागा सुटण्याची शक्यता आहे 2009 पासून बीडमध्ये मराठा उमेदवाराला शरद पवार यांनी पसंती दिली आहे... त्यामुळे इथला उमेदवार कोण असणार याचीही चर्चा सुरू आहे. एकमेकांचे प्रतिस्पर्धी असलेले राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा आता एकत्र उमेदवार देणार आहे त्यामुळे हे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते जमून घेतील का? पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचे झालेलं म्हणून मिलन कमी येईल का? राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा दरवर्षी मराठा चेहरा देण्याचा देण्याचा डाव पुन्हा एकदा शरद पवार यांच्याकडून पुन्हा टाकला जाणार का? उमेदवारी निश्चित झाल्यानंतर ओबीसी विरुद्ध मराठा असा थेट संघर्ष देखील इथं पाहायला मिळू शकतो.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा यावेळेस एकत्र आल्यामुळे इथला सामना एकतर्फी होईल अशी चर्चा आहे त्यात पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचं मनोमिलन झाल्यामुळे भाजपला ही निवडणूक सोपी जाईल अशी चिन्ह आहेत. मात्र, ऐनवेळी शरद पवार मराठा चेहरा देत भाजपचा गणित बिघडवणार का आणि मग बीडमध्ये कुणाचा झेंडा फडकणार याकडेही सर्वांचं लक्ष असणार आहे.