आमदार नितेश राणेंकडून `सिंधुदुर्ग नॅशनल फिल्म फेस्टिवल`ची घोषणा
कंटेनर थिएटरमध्ये यावर्षी पुन्हा एकदा ‘सिंधुदुर्ग फिल्म फेस्टिवल २०२०’ (SNFF) चे आयोजन
देवगड : सर्वाधिक राज्य आणि राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त, सामाजिक दिशा देणाऱ्या चित्रपटांचे दिग्दर्शक राजदत्त तसेच सिनेसृष्टीत स्वत:च्या कामाचा वेगळा ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री नयना आपटे यांना ‘एसएनएफएफ जीवनगौरव २०२०’ देऊन सन्मानित केले जाईल अशी घोषणा आमदार नितेश राणे यांनी केली आहे. देवगड येथील कंटेनर थिएटरमध्ये यावर्षी पुन्हा एकदा ‘सिंधुदुर्ग फिल्म फेस्टिवल २०२०’ (SNFF) चे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाचे यंदाचे दुसरे वर्ष आहे. या निमित्ताने घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी अभिनेते अनिल गवस, ‘चला हवा येऊ द्या’ फेम अभिनेत्री स्नेहल शिदम, महोत्सव दिग्दर्शक सुमित पाटील, माजी आमदार अजित गोगटे, जिल्हा सरचिटणीस बाळा खडपे आदी मान्यवर उपस्थित होते.
४८ तासांमध्ये बनवा लघुपट
फिल्ममेकर्सना स्वत:चीकला दाखवण्यासाठी मोठी संधी एसएनएफएफ घेऊन येत आहे. यामध्ये ४८ तासांमध्ये फिल्ममेकर्सना आपली कला सादर करायची आहे.
५ ते ६ मार्च दरम्यान देवगडमध्ये ही स्पर्धा होत असून कला आणि संस्कृती आणि पर्यटन या दोन विषयांवर फिल्ममेकर्सना लघुचित्रपट अथवा माहितीपट (डॉक्युमेंट्री) बनवायची आहे. या स्पर्धेसाठीचे चित्रिकरण केवळ देवगडमध्येच करायचे आहे.
विद्यार्थी, तरुण,महिला वर्गासाठी ही चर्चासत्र असणार आहेत. शाळेतल्या मुलांसाठी सिनेमा कसा पहावा ?, चित्रपट सृष्टीतील स्त्रियांचा सहभाग, चित्रपटांमुळे संस्कृती आणि पर्यटन क्षेत्राला मिळालेलेप्रोत्साहन या विषयांवर हे चर्चासत्र होणार आहे. एसएनएफएफसाठी सिनेसृष्टीतील विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. हे मान्यवर या चर्चासत्रांमध्ये सहभागी होतील.