मुंबई : संपूर्ण राज्यात युती झाली तरी सिंधुदुर्गात युती न होता शिवसेना विरुद्ध भाजप अशीच लढत झाली. सर्वाधिक लक्षवेधी लढत ही राणे विरुद्ध शिवसेना अशी दिसत होती. कणकवलीतून नारायण राणे यांचे चिरंजीव नितेश राणे हे भाजपकडून रिंगणात होते. त्यांच्याविरोधात शिवसेनेने विरोधात स्वाभीमानकडून आयात केलेले उमेदवार सतीश सावंत यांना उमेदवारी देऊन मोठी चुरस निर्माण केली. मात्र, शिवसेनेला यश आले नाही. दरम्यान, सावंतवाडी आणि कुडाळमधून शिवसेनेचे विद्यमान आमदार विजयी झालेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे राज्यमंत्री दीपक केसरकर हे १३ हजार ९४१ मतांनी विजयी झालेत. त्यांनी भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार राजन तेली यांना पराभूत केले. दीपक केसरकर हे तिसऱ्यांदा विधानसभेत गेले आहेत. त्यांनी विजयाची हॅ्ट्ट्रीक केली. मात्र, राजन तेली यांना नारायण राणे यांनी पाठिंबा जाहीर केला होता. मात्र, राणेंचा करिष्मा चालला नाही.



कुडाळ मतदारसंघातून शिवसेनेचे वैभव नाईक हे दुसऱ्यांदा विजयी झाले आहेत. वैभव नाईक यांनी नारायण राणे समर्थक आणि भाजप पुरस्कृत उमेदवार रणजीत देसाई यांना पराभवाची धूळ चारली. वैभव नाईक हे १४ हजार ३४९ मतांनी विजयी झाले आहेत. २०१४ मध्ये वैभव नाईक यांनी दिग्गज नेते नारायण राणे यांना पराभवाचा धक्का देत ते जाईंड किलर ठरले होते. आताच्या निवडणुकीत वैभव नाईक यांनी सुरुवातीपासून आघाडी घेतली होती. तरही रणजीत देसाई यांनी चांगली टक्कर दिली. मात्र, नाईक यांची आघाडी मोडता आली नाही.