विशाल रेवाडेकरसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, देवगड, सिंधुदुर्ग : उंच जागेवरून लोखंडी दोरखंडाला बांधलेल्या पुलीवरून घसरत खाली जाण्याचा थरारक खेळ म्हणजे 'झिप लाईन'... तब्बल 2 हजार वर्षांचा इतिहास असलेली ही झिप लाईन पूर्वी डोंगराळ भागात सामान वाहून नेण्यासाठी वापरली जायची... कालांतरानं त्याला पर्यटनस्थळांवरील थरारक खेळाचं स्वरुप प्राप्त झालं. आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगडमध्येही प्रथमच झिप लाईनची संकल्पना प्रत्यक्षात आलीये.याचं वैशिष्ट्य म्हणजे जमिनीपासून 280 फूट उंचीवर आणि 1 हजार 885 फूट लांबीची ही झिप लाईन आहे. आमदार नितेश राणे यांच्या हस्ते या झिप लाईनचं उद्धाटन झालं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पर्यटकांनीही या नव्या उपक्रमाचं स्वागत केलंय. पर्यटनाच्या दृष्टीनं दुर्लक्षित असलेल्या देवगडकडे पर्यटकांची पावलं या निमित्तानं वळतील...


जगातली सर्वात लांब झिप लाईन संयुक्त अरब अमिरातींमधील जेबेल जैस पर्वतांमध्ये आहे. तिची लांबी तब्बल 9 हजार 290 फूट आहे. मात्र 2018मध्ये झालेल्या एका अपघातानंतर ही झिप लाईन बंद करण्यात आलीये... 



त्याखालोखाल मॅक्सिकोमधील कॉपर कॅनयॉन इथली 8 हजार 350 फूट लांबीची झिप लाईन दुसऱ्या क्रमांकावर आहे.


तर पुर्तो रिकोमधील ओरोकोविसची 8 हजार 300 फूटांची 'एल माँट्रूओ' ही झिप लाईन तिसऱ्या स्थानी आहे.


सेंट मार्टीन बेटावरील रॉकलँड इस्टेट रेनफॉरेस्ट अॅडव्हेंचर्सची झिप लाईन तब्बल 1 हजार 50 फुट उंचीवरून सुरू होते. आणि केबलची लांबी आहे 2 हजार 800 फूट... या झिप लाईनचा अँगल 58 पूर्णांक 6 टक्के आहे... 


स्लोवेनियामधील स्की फ्लाइंग हिल्सची 1 हजार 857 फुटांवरील झिप लाईन स्टीपनेसमध्ये दुसऱ्या स्थानी आहे. तिचा व्हर्टिकल ड्रॉप 38 पूर्णांक 33 टक्के आहे.


आपल्या देवगडची झिप लाईन असा कुठला रेकॉर्ड करत नाही, हे खरंय... पण थरार तोच आहे... त्यामुळे कोकणात फिरायला जायचं प्लॅनिंग करत असाल, तर एक स्टॉप देवगडला नक्की घ्या.