प्रवासादरम्यान हरवलेल्या बहिणीं व्हॉट्सएप मेसेजमुळे सापडल्या
मुलींच्या आई-वडिलांनी ठाणे पोलिसांशी संपर्क साधला आणि ओळख पटवून आपल्या मुलींना ताब्यात घेतले.
ठाणे : सध्याच्या तरुणाईकडून व्हॉटसएपचा होणार अतिवापर ही पालकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. मात्र, नुकत्याच घडलेल्या एका घटनेत व्हॉटसएपमुळे दोन हरवलेल्या मुलींना शोधून काढण्यात यश आले. उत्तर प्रदेशातील गाजीपुर येथे राहणाऱ्या या दोन्ही बहिणी आपल्या पालकांसोबत चंदोली येथे राहणाऱ्या आपल्या नातेवाईंकाकडे आल्या होत्या. या मुलींचे वय अनुक्रमे १७ आणि ४ वर्षे इतके आहे. तसेच १७ वर्षांची किशोरी गतिमंद आहे. चंदोली येथून परतत असताना या दोघी गाजीपूरला जाण्याऐवजी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या गाडीत बसल्या. थोड्यावेळानंतर हा प्रकार त्यांच्या पालकांच्या लक्षात आला. यानंतर त्यांनी मुलींचा शोध सुरु केला.
शोध सुरु असताना या दोघी मुंबईला येणाऱ्या गाडीतून ठाणे स्थानकात दाखल झाल्या. भोजपुरी भाषा बोलणाऱ्या या दोन्ही बहिणी पोलिसांना आढळल्या. यानंतर पोलिसांनी त्या दोघींची चौकशी केली. परंतु, मुलींना घरचा पत्ता सांगत आला नाही, अशी माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त दीपक देवराज यांनी दिली.
यानंतर दोन्ही मुलींना पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतले. त्यांना कोर्टासमोर हजर करण्यात आले. यानंतर १७ वर्षीय मोठ्या बहिणीची मानसिक स्थिती ठीक नसल्याने तिची रवानगी ठाण्यातील मनोरुग्णालयात करण्यात आली. तर लहान बहिणीला डोंबीवलीतील अनाथआश्रमात पाठवण्यात आले होते. न्यायालयाने या दोन्ही मुलींच्या आईवडिलांचा शोध घेण्याचे आदेश दिले. तेव्हा ठाणे पोलिसांच्या मानवी तस्करी विरोधी पथकातील एका महिला कर्मचाऱ्याने मुलींशी भोजपुरी भाषेत संवाद साधला. त्यावेळी मुलींनी आपण गाजीपूरमध्ये राहणाऱ्या असल्याचे सांगितले. यानंतर पोलिसांनी ही माहिती व्हॉटसएप ग्रूपवरून संबंधितांपर्यंत पोहोचवली. हा मेसेज पोलिसांकडून व्हायरल करण्यात आला. त्यावेळी मुलींच्या एका नातेवाईकाने हा मेसेज पाहिला. यानंतर मुलींच्या आई-वडिलांनी ठाणे पोलिसांशी संपर्क साधला आणि ओळख पटवून आपल्या मुलींना ताब्यात घेतले.