पुण्यातील सहा जण आंजर्लेत बुडालेत, तिघांचा मृत्यू
दापोली (Dapoli) येथील आंजर्ले (Anjarle) समुद्रकिनारी बुडून तीन जणांचा मृत्यू (three drowned) झाला आहे. याआधी दोन दिवसांपूर्वी गणपतीपुळे येथेही अशीच घटना घडली होती.
रत्नागिरी : जिल्ह्यातील दापोली (Dapoli) येथील आंजर्ले (Anjarle) समुद्रकिनारी बुडून तीन जणांचा मृत्यू (three drowned) झाला आहे. याआधी दोन दिवसांपूर्वी गणपतीपुळे येथेही अशीच घटना घडली होती. कोल्हापुरातील बुडणाऱ्या दोघांना वाचविण्यात आले होते. मात्र, यावेळी दापोली येथे सहा जण पुण्याहून (Pune) फिरण्यासाठी आले होते. हे सहा जण समुद्रात पोहोण्यासाठी उतरले. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने सहा जण बुडू लागले. त्यापैकी तीन जणांना स्थानिकांनी वाचवले. तर तीन जण बुडालेत.
पुण्यातून कोकणात मौजमजा करण्यासाठी आलेल्या सहा तरुणांचा एक ग्रुप आला होता. त्यानंतर ते आंजर्ले समुद्रकिनारी फिरण्यास गेले होते. यावेळी त्यातील काहीजण समुद्रात उतरले. त्यानंतर त्यांचे मित्रही समुद्रात मजामस्ती करत होती. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने ते समुद्रात ओढले गेले. सहा जणांपैकी तीन जण समुद्रात पाण्याचा अंदाज न आल्याने बुडालेत. अक्षय साखेलकर, विकास श्रीवास्तव आणि मनोज गावंडे अशी बुडालेल्या तिघांची नावे आहेत. हे सर्व पुण्यातून दापोलीत फिरण्यासाठी आले होते.
समु्द्रात तरुण बुडत असल्याची बाब स्थानिकांच्या निर्दशनास आली. त्यानंतर त्यांनी त्यांना वाचविण्यासाठी समुद्रात उड्या घेतल्या. त्यामुळे तीन जणांना वाचवण्यात स्थानिकांना यश आले. बुडालेल्या सहा पर्यटकांपैकी तीन पर्यटकांचा यावेळी बुडून मृत्यू झाला. वाचवण्यात आलेल्या तीन तरुणांना सध्या दापोली येथील शासकीय रुग्णालयात अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, तिघे जण तोपर्यंत पाण्यात बेपत्ता झाले होते. त्यांचा शोध स्थानिक घेत होते. या घटनेची माहिती दापोली पोलिसांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ धाव घेतली. त्यानंतर बेपत्ता असलेल्या तिघांचा शोध घेण्यात आला. काही वेळाने त्यांचा शोध लागला.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी अशीच एक घटना रत्नागिरीतील गणपतीपुळे येथे घडली होती. कोल्हापूरमधील काही तरुण कोकणात फिरण्यासाठी आले होते. तेही गणपतीपुळे येथील समुद्राच्या पाण्यात उतरले होते. यावेळी ते अचानक पाण्यात ओढले गेले. त्यानंतर ते बुडू लागताच स्थानिकांनी मदतीसाठी समुद्रात उड्या घेतल्या. बुडत असणाऱ्या दोन जणांना वाचविण्यात यश आले.