सोलापूर :  बार्शीमध्ये सध्या फटे गँगची चर्चा जोरदार रंगली आहे. शेअर मार्केटमधून काही दिवसांतच पैसे दुप्पट करून देतो, असं आमिष दाखवत एका ठकसेनानं शेकडो लोकांची आयुष्यभराची रक्कम लुटली आहे. या गँगने एकूण किती जणांना आणि किती कोटींचा चुना लावलाय, हे आपण सविस्तर पाहुयात. (solapur barshi young man vishal fate cheated people by saying they double the money from the stock market)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लाख रुपये भरा आणि वर्षभरात 6 कोटी रुपये मिळवा. मंडळी, ही अशी स्कीम ऐकूनच तुमचं डोकं चक्रावलं असेल. दुदैवानं बार्शीकरही या फसव्या स्किमला भाळले आणि फसले. शेकडो बार्शीकरांना असं आमिष दाखवून फटे गँगनं कोट्यवधींचा गंडा घातला. 



शेअर मार्केटमधून पैसा कमवून देण्याच्या नावाखाली विशाल फटेनं हा लुटीचा गोरखधंदा सुरू केला होता. सुरूवातीला चांगला परतावा देऊन त्यानं लोकांचा विश्वास कमवला. 


मात्र आता हाच विशाल फटे कोट्यवधींचा चुना लावून पसार झालाय. केवळ विशालच नव्हे तर त्याचं संपूर्ण कुटुंबच गायब झालं होतं. मात्र पोलिसांनी विशालचा भाऊ वैभव फटे आणि वडील अंबादास फटेला अटक केली आहे. 


कोण आहे विशाल फटे? 


विशाल फटे मुळचा मंगळवेढाचा. वडील बार्शीतील महाविद्यालयात प्राध्यापक. बार्शीतील शिवाजी महाविद्यालयासमोर तो सायबर कॅफे चालवायचा. इथूनच तो छोट्या-मोठ्या प्रमाणात शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायचा. त्यानंतर त्यानं इतरांनाही चांगला परतावा देते असं सांगून पैसे घेण्यास सुरूवात केली. 


10 लाख रूपये भरले तर वर्षभरात 6 कोटी मिळतील असं आमिष दाखवायचा. कमी रकमेवर देखील 28 टक्के परतावा मिळेल असं सांगायचा. त्यामुळे अनेकांनी त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात पैशांची गुंतवणूक केली होती.


फटे गँगकडून झालेल्या फसवणुकी प्रकरणात आतापर्यंत 40 लोकांनी तक्रार दिलीय. फसवणुकीचा हा आकडा 12 कोटींवर पोहचला आहे. त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.


लोकांना कोट्यवधींचा चुना लावून विशाल फटे गायब झालाय. सोलापूर ग्रामीण पोलिसांची तीन ते चार पथकं त्याचा शोध घेत आहेत. याआधीही अशाच अनेक फसव्या स्कीममधून ठकसेनांनी लोकांना गंडा घातलाय. तरीही झटपट पैसे कमावण्याच्या नादात लोक विशाल फटे सारख्या भामट्यांच्या नादी लागतात, हे दुर्दैव.