Solapur Crime Horror News: सोलापूर जिल्ह्यातील माढा येथे एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गुन्हा घडल्यानंतर जवळपास 2 महिन्यांनी या प्रकरणाचा खुलासा झाला आहे. 2 महिन्यांपूर्वी एका अल्पवयीन विवाहितेने आत्महत्या केल्यानंतर त्याची माहिती पोलिसांना देण्यात आलेली नव्हती असं तपासात समोर आलं आहे. पोलिसांना कोणतीही माहिती न देता परस्पर या मुलीचा अत्यंविधी उरकण्यात आल्याचं स्पष्ट झाल्यानंतर या प्रकरणात माढा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. महिलांवरील अत्याचार दिवसोंदिवस वाढत असून मागील काही महिन्यांमध्ये महाराष्ट्रातील चित्र चिंताजनक असतानाच पोलिसांचं असंवेदनशील वागणं या प्रकरणामुळे पुन्हा अधोरेखित जालं आहे. नुकत्याच सामोर आलेल्या माहितीनुसार, माढ्यातील शिंदे वाडीत घडलेल्या या घटनेची माहिती स्थानिक पोलीस पाटलाला 2 दिवसांनी मिळाली होती. मात्र या प्रकरणा गुन्हा मात्र जवळपास दोन महिन्यानी दाखल झाल्याने पोलीस खात्याचा ढिसाळ कारभार समोर आळा आहे.


मध्यरात्री ती गावाबाहेरील कालव्याजवळ ती दिसली


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या प्रकरणामध्ये दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार सदर घटना माढ्याजवळ शिंदेवाडी गावामध्ये मागील वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात घडली. दाखल केलेल्या तक्रारीमधील तपशीलानुसार, 24 डिसेंबर 2023 रोजी मध्यरात्रीनंतर ही घटना घडली. या प्रकरणातील मयत मुलीचं नाव तनुजा अनिल शिंदे असं आहे. तनुजा ही केवळ 14 वर्षांची होती. तनुजाचे लग्न तिचे वडील अनिल नारायण शिंदे व चुलते सुनील नारायण शिंदे यांनी लावून दिले होते. मात्र तनुजा ही तिच्या नवऱ्याकडे नांदत नसून अन्य दुस-या गावातील एका तरूणाच्या संपर्कात होती, अशी माहिती तपासात समोर आली. 24 डिसेंबर 2023 रोजी पहाटे अडीचच्या सुमारास तनुजा तिच्या चुलत्यांना म्हणजेच धनाजी शिंदेंना अज्ञात मुलाबरोबर दिसून आली. गावाबाहेरील कालव्याजवळ तनुजा अज्ञात तरूणाबरोबर पळून जात असल्याचं धनाजी शिंदे यांना दिसलं. धनाजींना पाहताच तनुजापासून काही अंतरावर थांबलेली 2 मुलं पळून गेली.


2 दिवसांनी पोलिसांना कळवण्यात आलं


तनुजा एकटीच तिथे थांबून राहिल्यानंतर धनाजी यांनी तिला तू यावेळी इथं काय करत आहेस? अशी विचारणा केली. तनुजाने वेळ मारुन नेण्यासाठी खोटं कारण दिलं. धनाजी यांनी फोन करुन स्वत:चा भाऊ आणि तनुजाचे वडील सुनील शिंदेंना तिथे बोलावून घेतलं. दोघांनी तनुजाला मारहाण करत घरी आणलं. त्याच रात्री मन:स्ताप आणि निराशेमुळे तनुजाने विषप्राशन केलं. यातच तनुजाचा मृत्यू झाला. सदर घटनेची माहिती पोलिसांना न देता शिंदे कुटुंबाने परस्पर तनुजाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. 2 दिवसांनी गावभर या प्रकरणाची चर्चा झाल्यानंतर गावच्या पोलीस पाटील सुनीता शिंदेंनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली.  


2 महिन्यांपूर्वीच पोलिसांकडे होती माहिती तरी...


मृत तनुजा ही अल्पवयीन असताना 2021 मध्ये कुर्डू येथे राहणाऱ्या धनाजी जगताप नावाच्या तरूणाबरोबर तिचे लग्न लावून दिले होते. या बालविवाहाची माहिती पोलीस पाटीलांना 25 डिसेंबर 2023 रोजी गावातील दत्तात्रय शिंदे यांनी दिली होती, असेही तक्रारीमध्ये म्हटले आहे. याचाच अर्थ असा की पोलीस पाटलांना 2 महिन्यांपूर्वीच या आत्महत्येपासून अनेक गोष्टींची कल्पना असतानाही त्याची माहिती वरिष्ठांना देण्यात आली आहे. त्यामुळेच या प्रकरणानंतर आता पोलीस पाटलाच्या कार्यपध्दतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.


आरोपी कोण कोण?


पोलिसांनी 2 महिन्यांनंतर दाखल केलेल्या तक्रारीमध्ये तनुजाचे वडील अनिल शिंदे, चुलते धनाजी तसेच सुनील शिंदे आणि पती धनाजी जगताप यांचा आरोपी म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. तनुजाला आत्महत्येसाठी प्रवृत्त करणे, परस्पर अंत्यविधी उरकून पुरावे नष्ट करणे, अल्पवयीन मुलीचं लग्न लावून देणे यासारख्या कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात अद्याप पोलिसांनी कोणालाही अटक केलेली नाही. माढा पोलिसांचे सहायक पोलीस निरीक्षक नेताजी बंडगर या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.