सचिन कसबे, झी मीडिया, पंढरपूर : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठुराच्या पंढरपुरातील (Pandharpur) मंदिरात (Shri Vitthal Rukmini Mandir) काळाबाजार सुरु असल्याचे समोर आले आहे. विठोबाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांकडून पैसे घेऊन दर्शनासाठी सोडणाऱ्या दोघांना मंदिरातच रंगेहाथ पकडण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. हा सगळा प्रकार उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मंदिर समितीने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून दोन्ही एजंटविरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्री विठ्ठल दर्शनास आलेल्या भाविकांना झटपट दर्शन करून देण्याचे काम करणारे एजंटना बुधवारी मंदिरातच भाविकांसह पकडले आहे. शहरातील एका हॉटेल वर थांबलेल्या हैद्राबादमधील दोन भाविकांना दर्शन देण्याच्या आमिष दाखवून दोघांनी पैसे घेतले होते. पैसे घेऊन दर्शन करून देणारे एजंट सागर बडवे आणि शंतनु उत्पात यांनी संपर्क साधला होता. एका व्यक्तीसाठी दोन हजार असा दर ठरल्यानंतर त्यांना या एजंटनी मंदिरात आणले.


मात्र मंदिरातील कर्मचारी आणि पोलिसांना संशय आल्यानंतर दोघांची चौकशी करण्यात आली. चौकशीमध्ये दोघांनीही प्रत्येकी दोन हजार रुपये घेऊन दर्शन करण्याचे ठरवले असल्याचे समोर आले. यामुळे दर्शनाचा काळा बाजार करणारी टोळी सक्रिय असल्याचा प्रकार पुढे आला आहे. दुसरीकडे या पैसे घेऊन दर्शन करून देणाऱ्यांच्या साखळीत मंदिर मधील कोणी सहभागी आहे का याचा उलगडा पोलीस तपासात होण्याची शक्यता आहे.


"दोन तीन दिवसांपूर्वी समजलं होतं की, मंदिर समितीमध्ये हा प्रकार सुरु आहे. मंदिर समितीमध्ये दोन व्यक्ती शंतनु उत्पात आणि सागर बडवे हे भाविकांना घेऊन आले होते. कर्मचाऱ्यांनी त्यांना ओळखले भाविकांची चौकशी केली. चौकशीत दोन हजार रुपयांमध्ये दर्शन देण्याचे ठरवण्यात आले होते. समितीच्या आदेशानुसार आम्ही पुढील कारवाई करत आहोत. मंदिरातील यामध्ये कुणी सहभागी आहे का याचा शोध पोलीस तपासात लागेल. कोणालाही पाठिशी घातले जाणार नाही. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे," अशी माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी दिली.