सोलापूर : गणेशोत्सवासाठी कर्नाटकात गेलेल्या डीजे ऑपरेटरचा उपचारादरम्यान मृत्यू
Solapur Crime : सोलापुरातील एका डीजे ऑपरेटरच्या मृत्यूमुळे खळबळ उडाली आहे. गणेशोत्सवासाठी कर्नाटक डीजे वाजवण्यासाठी गेलेल्या तरुणाला जबर मारहाण करण्यात आली होती. त्यातच तरुणाचा मृत्यू झाला आहे.
अभिषेक अडेप्पा, झी मीडिया, सोलापूर : गणेशोत्सवासाठी (Ganeshotsav 2023) डीजे (DJ) घेऊन कर्नाटकातील (Karnataka) इंडी येथे गेलेल्या ऑपरेटरचा सोलापूर (Solapur) सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्रमोद अंबादास शेराल असे मृत्यू झालेल्या 32 वर्षीय तरुणाचे नाव आहे. मात्र अज्ञात लोकांनी केलेल्या मारहाणीमुळे प्रमोदचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केलाय. त्यामुळे या प्रकरणची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
प्रमोद शेराल हा अत्यंत गरीब कुटुंबातील आहे. मागील काही वर्षांपासून तो डीजे ऑपरेटर म्हणून काम करतो. गणेशोत्सव निमित्त त्याला विजापूर जिल्ह्यातील इंडी येथे डीजे वाजवण्याची सुपारी मिळाली होती. त्यासाठी विजापूरला गेला होता. मात्र तीन दिवसांपूर्वी रात्री त्याला अज्ञात लोकांनी घरासमोर जखमी अवस्थेत आणून सोडले. या सगळ्या प्रकारानंतर कुटुंबिय देखील हादरले होते.
जखमी प्रमोद यास कुटुंबियांनी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. प्रमोद याला कशासाठी इतकी बेदम मारहाण करण्यात आली? त्याला मारहाण कोणी केली? या सगळ्यांची उत्तरं सध्या अनुत्तरीत आहेत. या मारहाणीमुळेच त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप प्रमोदच्या कुटुंबियांनी आणि नातेवाईकांनी केलाय.
दरम्यान कर्नाटक पोलीस या प्रकरणाच्या तपासासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णलयात आले होते. या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घडलेल्या घटनेची माहिती कुटुंबियांनीकडून जाणून घेतली. मात्र माध्यमांना कोणतीही माहिती देण्यास नकार दिलाय. प्रमोदच्या मृत्यूची बातमी कळताच सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात त्याच्या नातेवाईक आणि मित्रमंडळीची मोठी गर्दी झाली होती. प्रमोदच्या कुटुंबियांची परिस्थिती अत्यंत साधारण आहे. घरात कमावणारा एकमेव तरुण होता. मात्र त्याचाच असा दुर्दैवी मृत्यू झालंय. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.