अभिषेक अड्डेपा, झी मीडिया, सोलापूर : सोलापुरातील (Solapur News) एका इंजिनीयर (engineer) तरुणाने आपल्या कामाने सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे. वाहनांमुळे (vehicle) होणारे प्रदूषण (air pollution) कमी करण्यासाठी अभिनव कल्पनेतून या तरुणाने गाडीचा एक पार्ट बनवला आहे. सोलापुरातील राहुल बऱ्हाणपुरे या तरुणाने वाहन क्षेत्रात केलेल्या अभिनव कामाची जगविख्यात टाटा (Tata) कंपनीनेही दखल घेतली आहे. टाटा कंपनीने राहुल बऱ्हाणपुरे याने बनवलेल्या पार्टचे पेटंट तब्बल साडेतेरा कोटी रुपयांना विकत घेतलं आहे. राहुल बऱ्हाणपुरे यांनी बऱ्याच मेहनतीनंतर आणि संशोधनानंतर हा पार्ट तयार केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोलापूरच्या दिगंबर जैन गुरुकुल प्रशाला कनिष्ठ महाविद्यालयात राहुल बऱ्हाणपुरे याने एम.सी.व्ही.सी ऑटोमोबाईल (automobile) क्षेत्रात शिक्षण घेतलं. वडील साडीच्या दुकानात कर्मचारी तर आई गृहिणी अशी घरची स्थिती असतानाही जिद्दीनं राहुलने इतकी मोठी मजल मारली आहे. सुरुवातीच्या काळात राहुल बऱ्हाणपुरेने एका खाजगी गॅरेजमध्ये दुचाकी, चार चाकी गाड्या दुरुस्तीचे काम केलं. हे करत असतानाच गाड्यांमध्ये होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी काही तरी करायला हवं याची कल्पना राहुलला सुचली. गेली अकरा वर्षे हा पार्ट तयार करण्यासाठी राहुल यांनी बरीच मेहनत घेतली.


यावर राहुल यांनी अनेक दिवस संशोधन करून चार चाकी गाड्यांमधील प्रदूषणाची तीव्रता कमी करण्यासाठी एक पार्ट बनवला. हा पार्ट इंडियन स्टॅंडर्ड नॉर्म्स नुसार बनवला असून याविषयीची माहिती त्यानी पोर्टलवर प्रसिद्ध केली. तीन ते चार कंपन्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला आणि पेटंटची मागणी केली. यामध्ये भारतातील टाटा मोटर्स कंपनीदेखील होती. टाटा कंपनीने राहुल बऱ्हाणपुरेंच्या पार्टमध्ये रस घेत त्या पार्टचे पेटंट घेतलं आहे.


पुढच्या वर्षापासून  होणार गाड्यांमध्ये वापर


"सध्याच्या वाहनांमध्ये इ.जी.आर  सिस्टमचा वापर केला जातो. या पार्टचं काम प्रभावीपणे होण्यासाठी पीसीएम या सेंसरद्वारे हा पार्ट नियंत्रित केला जातो. सायलेन्सर मधून बाहेर फेकली जाणारी 30 टक्के दूषित हवा या पार्टमुळे पुन्हा रिसायकल होऊन इंजिन मध्ये सोडली जाते. यामुळे प्रदूषणात 30 टक्के एवढी घट होईल. याशिवाय इंधनाची ही 10 टक्के बचत होते. नायट्रोजन ऑक्साईड कार्बन मोनॉक्साईड, हायड्रोकार्बन यासारखे घातक वायू चार चाकी वाहनांमधून उत्सर्जित होतात. त्यातील नायट्रोजन ऑक्साईड हा मानवी शरीरावर घातक असतो," असे राहुल यांनी सांगितले. टाटा मोटर्सकडून या नवीन पार्टचा वाहनांमध्ये पुढील वर्षापासून वापर होणार असल्याची माहिती राहुल यांनी दिली आहे.