अहमद शेख, झी मीडिया, सोलापूर  : दक्षिण सोलापूर तालुक्यातील आलेगाव शिवारातील एका विहिरीत विवाहित महिलेचा दोन लहान मुलांसह मृतदेह आढळून आला. या महिलेने विहिरीत उडी टाकून आत्महत्या केली असावी, अशी शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. महिला आणि तिची मुलं दक्षिण सोलापूर तालुक्यातील तिल्हेहाळ गावची रहिवासी आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोनाली चोपडे, मोठा मुलगा संतोष चोपडे आणि लहान मुलगा संदीप चोपडे अशी मृतांची नावं आहेत. दक्षिण सोलापूर तालुक्यातील आलेगाव इथं  दयानंद शिंदे याची शेती आहे. या शेतात तिल्हेहाळ इथल्या सोनाली चोपडे हिने आपल्या दोन मुलांसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केली.


या घटनेची माहिती मिळताच वळसंग पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने पाण्यातून तिघांचे मृतदेह बाहेर काढले.


नेमकी घटना काय?
सिद्राम उर्फ गोटू चोपडे हे आपल्या कुटुंबासह आलेगाव शिवारात शेतातील वस्तीवर राहतात. सिद्राममहे मोलमजुरी करतात, तर सोनाली शेळ्या राखण्याचं काम करत होती. सिद्राम मंगळवारी मजुरीच्या कामावर गेला होता. मुलांना शाळेला सुट्टी असल्याने ते आईबरोबर शेळ्या चारण्यासाठी गेले होते. 


संध्याकाळी सिद्राम कामावरुन घरी आले, पण त्यांना घरात सोनाली आणि मुलं दिसली नाहीत. त्यामुळे त्यांनी नातेवाईकांना कळवलं. रात्री उशीरापर्यंत शोधाशोध सुरु होती. शोधाशोध सुरु असताना शेतातील विहीरीच्या कडेला संतोष आणि संदीप या मुलांच्या टोपी आणि चप्पल आढळून आल्या. 


त्यामुळे सर्वांनी विहिरीकडे धाव घेतली. विहिरीतलं दृष्य पाहून सिद्राम आणि नातेवाईकांना धक्का बसला. सोनाली आणि दोन चिमुकल्यांचे मृतदेह विहिरीतल्या पाण्यावर तरंगत होते. 


आत्महत्येचं नेमकं कारण काय याचा तपास पोलीस करत आहेत.