अभिषेक अदेप्पा, झी मीडिया, सोलापूर : शाळेची फी न भरल्याने शाळा प्रशासनाकडून विद्यार्थ्यांची थेट पोलिसात रवानगी करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार सोलापूरात (Solapur) उघडकीस आला आहे. सोलापूरातील एका इंग्लिश शाळेने (English School) फी न भरणाऱ्या विद्यार्थ्यांना पेपर सोडवण्यापासूनही वंचित ठेवल्याचा आरोप पालकांनी केला आहे. शाळा प्रशासनाच्या मनमानी कारभाराविरोधात पालकांनी आंदोलन केलं. याची तक्रार शाळा प्रशासनाने पोलिसात केली. या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी पालकांसह विद्यार्थ्यंनाही (Student) पोलीस व्हॅनमधून पोलीस स्थानकात नेलं. घडलेल्या प्रकाराबद्दल जिल्ह्यात संताप व्यक्त केला जात असून शाळा प्रशानावर कारवाईची मागणी करण्यात येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विद्यार्थ्यांची संपूर्ण फी भरलेली असतानाही काही विद्यार्थ्यांविरोधात शाळा प्रशासनाने आकासाने कारवाई केल्याचा आरोप पालकांनी केला आहे. तसंच या विद्यार्थ्यांना दमदाटीही करण्यात आली. वास्तविक शाळेच्या मनमानी कारभाराची तक्रार शिक्षण मंत्र्यांकडे करण्यात आली होती. याचा राग मनात धरून शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांना दमदाटी केल्याचा आरोपही पालकांनी केला आहे. 


शाळा प्रशासनाने मात्र पालकांचे हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. विद्यार्थ्यांचे पेपर पूर्णपणे सोडवून घेतल्याचा दावा शाळेने केला आहे. दुसरीकडे पालकांच्या सांगण्यावरुनच विद्यार्थ्यांना पोलीस व्हॅनमधून नेण्यात आल्याचा दावा पोलिसानी केला आहे.