नागपूर: 'आयएनएक्स मीडिया' आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी अटकेत असलेले माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग व काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सोमवारी तिहार तुरुंगात जाऊन भेट घेतली. या अनपेक्षित भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी या भेटीविषयी काही शंका उपस्थित केल्या आहेत. ते सोमवारी नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी त्यांनी म्हटले की, सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग यांना जबरदस्तीने चिदंबरम यांच्या भेटीला जावे लागले. कारण, चिदंबरम एखादे गुपित फोडतील, याची भीती त्यांना होती, असा आरोप सुधीर मुनगंटीवार यांनी केला. त्यामुळे आता काँग्रेसकडून यावर काय स्पष्टीकरण देण्यात येणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. 


आयएनएक्स मीडिया आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने २१ ऑगस्ट रोजी पी. चिदंबरम यांना अटक केली होती. यानंतर त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. या काळात पी. चिदंबरम यांनी जामीनासाठी बरेच प्रयत्न केले. मात्र, न्यायालयाने वेळोवेळी त्यांच्या न्यायालयीन कोठडीला मुदतवाढ दिली होती. काही दिवसांपूर्वी झालेल्या सुनावणीवेळी दिल्ली उच्च न्यायालयाने चिदंबरम यांना ३ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती.



चिदंबरम हे गेल्या ५ सप्टेंबरपासून तिहार तुरुंगात आहेत.  चिदंबरम यांना झालेली अटक काँग्रेस पक्षासाठी मोठा धक्का होता. यानंतर पक्षाकडून सातत्याने त्यांची पाठराखण केली जात आहे. या पार्श्वभूमीवर आजच्या भेटीत या सगळ्यांमध्ये काय संवाद झाला, याची उत्सुकता सर्वांना आहे. काँग्रेस पक्ष चिदंबरम यांच्या सोबत आहे, असा संदेश या भेटीतून देण्याचा सोनियांचा उद्देश आहे.