नाशिक: लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ ओढवल्याने पायी चालत निघालेल्या मजुरांचे तांडेच्या तांडे महाराष्ट्रातील अनेक रस्त्यांवर दिसत आहेत. या मजुरांच्या कुटुंबीयांचे होणारे हाल पाहून अनेकांच्या काळजाचे पाणी होत आहे. मात्र, आता नाशिकमध्ये मजुरांची ही पायपीट थांबण्याची शक्यता आहे. कारण नाशिकमध्ये शनिवारी रात्री पायी चालत जाणाऱ्या मजुरांसाठी स्थानिक प्रशासनाकडून विशेष बसची व्यवस्था करण्यात आली. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून प्रशासनाने हा निर्णय घेतल्याचे समजते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एसटी सर्वांना मोफत नाही; परिवहन मंत्र्यांनाच अंधारात ठेवून निर्णयात बदल


त्यामुळे आता या विशेष बस मजुरांना त्यांच्या राज्याकडे घेऊन निघाल्या आहेत. परप्रांतीय मजुरांना त्यांच्या राज्याच्या हद्दीपर्यंत सोडण्यात येईल. काल रात्री कसारा घाटातून पायी चालत जाणाऱ्या नागरिकांना बसमधून त्यांच्या राज्याच्या दिशेने रवाना करण्यात आले. त्यामुळे पायी चालत जाणाऱ्या मजुरांना मोठा दिलासा मिळाला आहे. 


मुंबई-आग्रा महामार्गावर परप्रांतीयांची तोबा गर्दी


सध्या रेल्वेकडून परराज्यातील मजुरांना त्यांच्या गावी सोडण्यासाठी विशेष गाड्या सोडल्या जात आहेत. मात्र, या गाड्यांतून लोकांची वाहतूक करण्यास मर्यादा असल्याने अनेकजण अजूनही महाराष्ट्रातच अडकून पडले आहेत. याशिवाय, अनेकांकडे रेल्वेचे तिकीट आणि वैद्यकीय प्रमाणपत्रासाठीही पैसे उरलेले नाहीत. त्यामुळे अनेक मजूर पायीच आपल्या गावाकडे चालत निघाले आहेत. 


कालच मुंबई-आग्रा महामार्गावर परप्रांतीयांची मोठी गर्दी झाल्याचे दिसून आले होते. सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम धाब्यावर बसवत हे मजूर ट्रकमधून आपापल्या गावी परतत आहेत. एवढचं नाही तर काही मजूर थेट रिक्षामार्गे आपल्या गावी निघाले आहेत. यामुळे नाशिकचा मुंबई-आग्रा महामार्ग हा गर्दीने फुलून गेला आहे.