निलेश वाघ, झी 24 तास, देवळा : चाळीत साठवलेला कांदा खराब झाल्याने शेतकऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागते. मात्र, नाशिकच्या देवळा तालुक्यातील सावकीच्या सुरेश पाटील आणि प्रकाश पाटील या शेतकऱ्यांनी त्यावर नामी शक्कल शोधली आहे. या शेतकऱ्यांनी सडका कांदा शोधण्याचे अत्याधुनिक तंत्रज्ञान कांदा चाळीत बसविले आहे. त्यामुळे होणारे नुकसान टाळण्यास मदत होईल, अशी आशा या शेतकऱ्यांना आहे. देवळा परिसरातील हा पहिलाच प्रयोग असून परिसरातील शेतकरी हा प्रयोग पाहण्यासाठी गर्दी करत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या नाशिक जिल्ह्यातील बहुतेक भागात उन्हाळी कांदा चाळीत साठवून ठेवण्याची लगबग सुरू आहे. कांद्याला चांगला भाव आल्यानंतर शेतकरी कांदा विक्रीसाठी बाजारात पाठवतात. मात्र, यादरम्यान चाळीतील एखादा जरी कांदा सडला तर इतर कांद्याला त्यापासून धोका निर्माण होतो. पर्यायाने संपूर्ण कांदा सडून जातो. शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीचा समाना करावा लागतो. नेमकी हीच बाब घेऊन, पाटील कुटुंबीयांनी त्यांच्या साठ फूट चाळणीत सुमारे चारशे ते साडेचारशे क्विंटल कांदा साठवला आहे. यामध्ये या सेन्सरचे दहा युनिट बसविले आहे. प्रत्येक कप्प्यात पाईपमधून हे युनिट खाली सोडले आहे. गोदाम इनोव्हेशन या कंपनीच्या सहकार्याने सदर यंत्रणा बसवली आहे. यासाठी सध्या सव्वा ते दीड लाख रुपये खर्च आल्याचं या शेतकऱ्यांनी सांगितलं. तरी सेन्सरद्वारे सडका कांदा शोधून कांद्याचं संभाव्य नुकसान टाळता येईल, असा दावा या शेतकऱ्यांनी केला आहे. 


नाशिक जिल्ह्यात सात ते आठ ठिकाणी ही सेन्सर यंत्रणा बसविण्यात आली आहे. कांद्यातील आद्रतेचं प्रमाण तसेच अमोनिया आणि इतर वायूंमुळे चाळीतील कांदा कोणत्या भागात खराब होतो, ते सेन्सरद्वारे दर्शवले जाते. यामुळे सडका कांदा ताबडतोब बाहेर काढून उर्वरित कांदा खराब होण्यापासून वाचवता येतो. यासाठी कृषी विभाग आणि 'आत्मा' या संस्थेचे सहकार्य लाभले आहे. एखादा सकडा कांदा संपूर्ण चाळीतील कांदा सडवतो. शेतकऱ्याने कष्टाने पिकवलेला कांद्याचे अतिशय नुकान होतं. अशावेळी या सेन्सर यंत्रणाचा शेतकऱ्यांना खूपच फायदेशीर होत आहे. मात्र, यंत्रणेला लागणारा खर्च हा सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर आहे. शासनाने या सेन्सर यंत्रणेला सबसिडी दिल्यास ही यंत्रणा शेतकऱ्यांना वरदान ठरेल, यात शंका नाही.