SSC Exam: महत्त्वाची बातमी! `या` तारखेपासून दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार हॉल तिकीट
SSC Exam 2024 Hall Ticket: महाराष्ट्र राज्य मंडळातर्फे माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच दहावीची बोर्डाची परीक्षा (Maharashtra Board 10th Exam) 1 मार्च ते 26 मार्चदरम्यान होणार आहे. याच परीक्षेसंदर्भातील महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
Maharashtra Board SSC Exam 2024 Hall Ticket Update: दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. परीक्षा अधिक तोंडावर आलेली असतानाच आता हॉल तिकीट कधी मिळणार याची घोषणा करण्यात आली आहे. राज्य मंडळातर्फे माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच दहावीची बोर्डाची परीक्षा 1 मार्च ते 26 मार्चदरम्यान होणार आहे. या परीक्षेसाठी हॉल तिकीटं कधी मिळणार याची घोषणा बोर्डाने केली आहे. ऑनलाइन माध्यमातून हॉल तिकीट डाऊनलोड करता येणार आहे.
कधीपासून आणि कुठून डाऊनलोड करता येणार हॉल तिकीट?
दहावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा 10 फेब्रुवारीपासून सुरु होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर या परिक्षांसाठीही हॉल तिकीट महत्त्वाचं ठरणार आहे. म्हणूनच विद्यार्थ्यांना बुधवार 31 जानेवारी 2024 पासून हॉल तिकीटं डाऊनलोड करता येणार आहे. सर्व माध्यमिक शाळांच्या मार्च 2024 च्या परीक्षेची प्रवेशपत्रे म्हणजेच हॉल तिकीटं ऑनलाइन डाऊनलोड करता येतील. बोर्डाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर ‘स्कूल लॉगिन’मध्ये हॉलतिकीट डाऊनलोड करता येणार आहे.
परीक्षा कधी होणार?
बोर्डाकडून घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यातच जाहीर करण्यात आल्या आहेत. इयत्ता बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 23 मार्च 2024 या दरम्यान होणार आहे. तर दहावीची परीक्षा 1 मार्च ते 26 मार्च 2024 या काळात घेतली जाणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, मुंबई, कोल्हापूर, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, लातूर आणि कोकण या 9 विभागीय मंडळातर्फे घेण्यात येणार आहे.
प्रॅक्टीकल परीक्षा कधी होणार?
दहावी प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा शनिवार दिनांक 10 फेब्रुवारी 2024 ते गुरुवार, दिनांक 29 फेब्रुवारी 2024 आणि 12 वी प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा शुक्रवार दिनांक 2 फेब्रुवारी ते मंगळवार दिनांक 20 फेब्रुवारी 2024 या कालावधीमध्ये घेण्यात येणार आहे.
10 मिनिटांचा अतिरिक्त वेळ
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा देताना दोन्ही परीक्षांसाठी 10 मिनिटांचा अतिरिक्त वेळ दिला जाणार आहे. पेपरफुटी आणि कॉपीचे प्रकार टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. एखाद्या पेपरसाठी 3 तासांचा वेळ देण्यात येत असेल तर यंदा हा वेळ 3 तास 10 मिनिटांचा असणार आहे.
अर्धा तास आधी पोहचा
परीक्षेला येणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्धा तास आधी परीक्षा केंद्रावर उपस्थित रहावं लागेल, अशा सूचना बोर्डाने दिलेल्या आहेत. विद्यार्थ्यांची संपूर्ण तपासणी करुनच त्यांना परीक्षा केंद्रांमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे वेळेआधी विद्यार्थ्यांनी केंद्रावर पोहचावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत.