पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन २०२० मध्ये घेण्यात येणाऱ्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर झाले आहे. त्यानुसार बारावीची परीक्षा १८ फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत पार पडेल. तर दहावीची परीक्षा ३ मार्च ते २३ मार्च या काळात होईल. राज्य शिक्षण मंडळाच्या पुणो, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या नऊ विभागीय शिक्षण मंडळांतर्गत राज्यातील दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतल्या जातात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिक्षण मंडळाच्या www.mahahsscboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना हे वेळापत्रक पाहता येईल. विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन करता यावे म्हणून मंडळाकडून ऑक्टोबरमध्ये संभाव्य वेळापत्रक जाहीर केले जाते. प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा आणि अन्य विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे परीक्षेपूर्वी मंडळामार्फत कळवले जाईल. विद्यार्थ्यांना शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांकडे छापील स्वरुपात अंतिम वेळापत्रक मिळेल.


विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी शिक्षण मंडळाच्या वेबसाईटला भेट देवून वेळापत्रकाची पाहाणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. अन्य वेबसाइट्स, व्हॉट्सअॅप व इतर सोशल माध्यमांतून प्रसिद्ध वा व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये, असे आवाहनही मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी केले आहे.