मयुर निकम, झी मीडिया, बुलढाणा : नादुरुस्त बसेसची माहिती असतानाही या बसेस मार्गावर पाठविण्याचा एसटी महामंडळ प्रशासनाचा हट्ट प्रवाशांच्या जीवावर बेतत आहे. मार्गावर बसेस बंद पडण्याचे प्रकार वाढत असतानाच अपघात होण्याच्या प्रकारात वाढ होत आहे. त्यातूनच या बसेस प्रवाशांसाठी अक्षरश: कर्दनकाळ ठरत असल्याचे अस्वस्थ चित्र आहे. बुधवारी अकोला-सिल्लोड बसच्या क्लच प्लेट खराब झाल्याने बोथा येथील ज्ञानगंगा अभयारण्यात बस बंद पडली. दरम्यान बसमधील 43 प्रवाशी वन्यप्राण्यांच्याच हवाली केल्यासारखे होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कारण भरदुपारी अडीच तास ही बस तशीच उभी होती, आणि प्रवाशांना घेण्यासाठी दुसरी बस देखील अडीच तासाने आली. तेव्हा प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला. कारण अभयारण्यात कोणत्याही बाजूला पायी जाणे, रस्त्यावर नवीन वाहनाची वाट पाहणे देखील धोक्याचे आहे.


तत्पूर्वीच कोथळी फाट्यावर घडलेल्या बस अपघाताने प्रशासनाची दिरंगाई पुन्हा अधोरेखित झाली आहे. मावळत्या वर्षात 96 अपघात झाल्याने राज्य परिवहन मंडळाची "बस रस्त्यावर आणि मरण डोक्‍यावर" अशी अवस्था दिसून येत आहे.


लाखो प्रवाशांची "लाइफलाइन" असलेल्या एसटी बसची अवस्था गेल्या काही वर्षांपासून डबघाईला आली आहे. नियोजनाच्या अभावामुळे आर्थिक आवक मोठया प्रमाणावर असतानाही बसेसच्या दुरुस्तीसाठी आणि स्पेअरपार्टच्या खरेदीसाठी प्रशासनाकडे निधीच उपलब्ध नाही. त्यामुळेच या बसेस मार्गावर पाठविण्याच्याच लायकीच्या राहिलेल्या नाहीत. 


तरीही प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन आणि केवळ महसूलाच्या वाढीसाठी प्रशासनाच्या वतीने या बसेस मार्गावर पाठविण्यात येत आहेत, त्यातूनच रस्त्यावरील अपघातांना निमंत्रण मिळत आहे. 


मंगळवारी दुपारी २ वाजता अकोला-सिल्लोड लांब पल्ल्याची स्टिल बॉडी व आकर्षक रंगोटी केलेली बस  43 प्रवाशी घेऊन अकोला येथून निघाली मात्र मधेच बोथा ज्ञानगंगा अभयारण्यात बंद पडली. 


एक दोन तास ताटकळत बसल्यानंतर  प्रवाशांना पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आले.तत्पूर्वी या ठिकाणी पट्टेदार वाघाचा संचार होता त्यामूळे या जंगलात त्यांनी घालवलेला वेळ धोकेदायकच म्हणावा लागणार.
 
बुलडाणा जिल्ह्यातील एकुण 7 आगाराच्या ताफ्यात 430 बसेस आहेत. त्यातील बहुतांश बसेस नादुरुस्त आहेत. धक्कादायक बाब म्हणजे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या नियमानुसार यातील बहुतांशी बसेस या जुन्या आहेत. त्यामुळे त्या धोकादायक ठरत आहेत. 
याबाबत प्रादेशिक परिवहन कार्यालयाने एसटी प्रशासनाला वारंवार तंबी दिली आहे. 


मात्र, प्रशासनाच्या वर्तवणुकीत फारसा फरक पडलेला नाही. त्यातूनच अपघातांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामध्ये नागरीक आणि प्रवाशांचा हकनाक बळी जाण्याचा धोका वाढलाआहे.


चोर सोडून संन्याशाला फाशी...


नादुरुस्त बसेसची दुरुस्ती करुन या बसेस मार्गावर पाठविण्याची प्रशासनाची मानसिकताच नाही. बहुधा त्यांच्या स्पेअरपार्टच्या खरेदीसाठी प्रशासनाकडे पुरेसा निधीच नाही. 


हे वास्तव असतानाच मार्गावर बस बंद पडल्यावर चालक आणि वाहकाना रिकव्हरी व्हॅन येईस्तोवर तिथेच थांबावे लागते. रात्र झाली तरी बेहत्तर पण कर्तव्याला जागावे लागते. 


मात्र बसेसचे जे अपघात झाले, त्यातील काही मोजक्‍या अपघातांचा अपवाद वगळता बहुतांशी अपघात हे चालकाच्या नव्हे, तर प्रशासनाच्या अक्षम्य चुकीमुळे झाले आहेत. 


परंतु या अपघातांना प्रशासनाला जबाबदार न धरता चालकालाच जबाबदार धरले जात आहे. प्रशासनाचा हा प्रकार म्हणजे "चोर सोडून संन्याशाला फाशी' असाच आहे. त्यामुळे यापुढे बसच्या बिघाडामुळे अपघात घडल्यास प्रशासनावरच सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी काही प्रवाशांनी केली आहे.