गडचिरोली - विदर्भातील आलापल्ली एटापल्ली रस्त्यावर गुरुपल्ली येथे बुधवारी सकाळी भरधाव ट्रक आणि बसची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात पाच जण ठार झाले. मृतांमध्ये तीन मुलींचा समावेश आहे. या अपघातात तीन जण जखमी झाले आहेत. त्यांना नजीकच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, राज्य परिवहन विभागाची एसटी बस अहेरीहून एटापल्ली मार्गे बुर्गीकडे निघाली होती. त्याचवेळी एटापल्लीहून लोहखनिज घेऊन येणार ट्रक अहेरीच्या दिशेने निघाला होता. यावेळी ट्रक आणि एसटी बस यांची समोरासमोर धडक झाली. बसमध्ये राणी दुर्गावती शाळेतील काही विद्यार्थीही होते. ते सकाळी शाळेला निघाले होते. अपघातात त्यामधील तीन मुलींचा मृत्यू झाला. त्याचबरोबर अन्य दोन प्रवासी जखमी झाले. मृतांची नावे अद्याप समजलेली नाही. या अपघाताची माहिती मिळताच राज्य परिवहन विभागाचे अधिकारी घटनास्थळी रवाना झाले.