मुंबई : ST employees strike : राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा तिढा कायम आहे.  (ST employees strike continues) मुंबई उच्च न्यायालयाने संप बेकायदेशीर ठरवले आहे. तसेच राज्य सरकारकडून संप मागे घेण्याचे आवाहन केले. असेत असताना संपच सुरुच आहे. उच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीसोबत आज एसटी संघटनांची बैठक होणार आहे. त्यामुळे या बैठकीत तोडगा निघणार का, याची उत्सुकता आहे. तर न्यायालयाने 22 नोव्हेंबरपर्यंत सुनावणी पुढे ढकलली आहे. तर दुसरीकडे 6895 कर्मचारी कामावर हजर झाल्याचा दावा एसटी महामंडळाने केला आहे. (ST employees strike continues, 6895 employees at work)


एसटी महामंडळाचा दावा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यातल्या विविध एसटी आगारांमध्ये सोमवारी 6 हजार 895 कर्मचारी कामावर हजर होते, असे एसटी महामंडळानं सांगितले. हजेरी पटावरील एकूण कर्मचाऱ्यांची संख्या 92 हजार 266 इतकी आहे. एसटी आगारांतून दुपारी चार वाजेपर्यंत 51 एसटी बसेस बाहेर पडल्या. त्यातून 1 हजार 317 प्रवाशांनी प्रवास केल्याचे महामंडळाने म्हटलंय. 


संप मागे घ्या, चर्चा करु -परब


एसटी संपाची कोंडी कायम आहे. संप मागे घ्या, चर्चा करु आणि प्रश्न सोडवू, असे आवाहन पुन्हा एकदा अनिल परब यांनी केले आहे. तर विलिनीकरण शक्य नाही, योग्य पर्याय काढायला पाहिजे, असं शरद पवारांनी म्हटलंय. कोर्टानं नेमलेली समिती आणि एसटी संघटनांची आज बैठक होणार आहे. राज्याचे मुख्य सचिव आणि या समितीचे अध्यक्ष सीताराम कुंटे यांनी संध्याकाळी मंत्रालयात बैठक बोलावली आहे. 


एसटी महामंडळाने कामगार संघटनेवर न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी याचिका दाखल केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांना आत्महत्या करण्यापासून रोखा, अशी सूचना सुनावणीवेळी उच्च न्यायालयाने केली. संपासंदर्भातली पुढची सुनावणी 22 नोव्हेंबरला होणार आहे. 


राज्यात या ठिकाणी आंदोलन सुरुच


रत्नागिरी जिल्ह्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरुच आहे. सोमवारी कार्तिकी एकादशीनिमित्त रत्नागिरीतल्या कर्मचा-यांनी विठ्ठल रखुमाईचं पूजन केले. यावेळी आंदोलन सुरुच ठेवण्याचा त्यांनी निर्धार केला. एसटीचे राज्य शासनात विलिनीकरण व्हावं यासाठी विठुरायाला साकडंही घातले. 


जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा


शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी नांदेडमध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी सहकुटुंब जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. नांदेडमध्ये 31 ओक्टॉबर पासून एस टी कर्मचा-यांचा संप सुरू आहे. जिल्ह्यातील सर्व 9 आगार पूर्णपणे बंद आहेत. तुटपुंज्या पगारात मुलांचं पालन पोषणही नीट करता येत नसल्याच्या भावना महिलांनी व्यक्त केल्या.


मावळमधल्या एसटी कर्मचाऱ्यांना धान्यवाटप करण्यात आले. तळेगावतल्या जन विकास समितीचे किशोर आवारे यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना पुरेल इतके धान्यवाटप केले. संकटात सापडलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी यावेळी पांडुरंग धावून आल्याची भावना व्यक्त केली.