आजपासून होणारी एसटी महामंडळाची दरवाढ पुढे ढकलली
`वाढते इंधनदर आणि कामगारांची वेतनवाढ यामुळे महामंडळावर आर्थिक बोजा पडलाय`
मुंबई : राज्य परिवहन मंडळानं मान्यता दिली नसल्यामुळं एसटी महामंडळाची दरवाढ पुढे ढकलण्यात आली आहे. वाढते इंधनदर, कामगारांची वेतनवाढ यामुळे महामंडळावर आर्थिक बोजा वाढल्यामुळं मुंबई-एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेसच्या तिकीट दरात १८ टक्के वाढ करण्याचा निर्णय एसटीनं घेतला होता.
मात्र, अद्याप त्याला राज्य परिवहन प्रधिकरणानाची मान्यता मिळाली नसल्यामुळं तुर्तास ही भाडेवाढ टळली आहे..
वाढते इंधनदर आणि कामगारांची वेतनवाढ यामुळे महामंडळावर आर्थिक बोजा पडला आहे. त्यासाठी ही दरवाढ करणं अपरिहार्य असल्याचं कारण एसटी महामंडळानं दिलं होतं. १५ जूनपासून अर्थातच आजपासून ही दरवाढ लागू होणार होती.
दरवाढीनंतर एसटी प्रवासासाठी भाडे आकारणी ५ रुपयांच्या पटीत केली जाणार आहे. उदाहरणार्थ एखाद्या प्रवासाचं तिकीट ७ रुपये असेल तर त्याऐवजी ५ रुपये आकारले जातील. तर ८ रुपये तिकीट असलेल्या ठिकाणी १० रुपये तिकीटदर आकारला जाणार आहे. सुट्ट्या पैशांसाठी प्रवासी आणि एसटी वाहकांत नेहमीच वादावादी होते. यावर उपाय म्हणून हा निर्णय घेतल्याचं एसटी महामंडळानं सांगितलंय.