मुंबई :  एसटी महामंडळ आतापर्यंत फक्त प्रवासी वाहतूक करत होतं. परंतु सद्य परिस्थिती पाहता महामंडळ मालाची वाहतूकही करणार आहे. महाराष्ट्र शासनाने दिनांक १८ मे रोजी प्रसारित केलेल्या अधिसूचनेद्वारे कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी एसटी महामंडळास प्रवासी वाहनांमधून मालवाहतूक करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. अशी माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष  अॅड. अनिल परब यांनी दिली. या निर्णयामुळे कोकणचा हापूस मुंबई-पुण्यात दाखल होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एसटीने  मालवाहतूकीचा  प्रारंभ  कोकणच्या हापूस आंब्याच्या वाहतूकीने  केला असून १५० आंब्यांच्या पेट्या घेऊन एसटीचा एक ट्रक रत्नागिरी कडून बोरिवलीकडे निघाला आहे. महामंडळाकडे सुमारे १८ हजार ५०० बसेस आहेत.  त्यामध्ये सुमारे ३०० ट्रक चा समावेश आहे. महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करण्यासाठी, महामंडळाने प्रवासी वाहतूकीसाठी असलेल्या सुविधांचा लाभ मालवाहतूक करण्यासाठी वापरण्याचा निर्णय घेतला आहे.


यादरम्यान एसटीचे मालवाहतुक वाहन तयार करण्यात येणार आहे. त्यामधून नऊ मेट्रिक टन पर्यंत वजनाच्यामालाची वाहतूक थेट पद्धतीने किंवा टप्पा पद्धतीने केली जाणार आहे. यासाठी बुकिंगची व्यवस्था, महामंडळाच्या प्रत्येक आगारात व बस स्थानकावर उपलब्ध करून दिली जाणार आहे व यासाठीची कार्यप्रणाली लवकरच प्रसिद्ध केली जाणार असल्याचं देखील अनिल परब यांनी सांगितलं आहे. 


कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्यामध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या तसेच इतर मालाच्या वाहतुकीवर विपरीत परिणाम झाला आहे व त्यामुळेच राज्य परिवहन महामंडळाने अतिशय माफक दरामध्ये मालवाहतूक करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय या कामकाजावर करडी नजर ठेवण्यासाठी स्वतंत्र कक्षाची निर्मिती आणि विभागीय कार्यालयात समन्वय अधिकाऱ्याची (नोडल ऑफिसर) ची नेमणूक करण्यात आली आहे.