Konkan Ganeshotsav: गणेशोत्सव हा प्रत्येकाच्याच आवडीचा व जिव्हाळ्याचा सण आहे. संपूर्ण महाराष्ट्रात लाडक्या बाप्पााच्या आगमनासाठी जय्यत तयारी केली जाते. घराघरात गणपतीसाठी आरास करण्याची तयारीही एक महिना आधीपासूनच केली जाते. कोकणात गणेशोत्सवाचा एक वेगळाच उत्साह असतो. अशात मुंबई-पुण्यातून कोकणात जाणाऱ्या चाकरमानी दोन महिने आधीपासूनच तयारी करत असतात. रेल्वे प्रशासनाने कोकणात जाण्यासाठी जादा गाड्या सोडल्या आहेत. त्याचबरोबर, एसटी महामंडळानेही प्रवाशांसाठी 4 हजार गाड्या सोडल्या आहेत. मात्र अवघ्या काही दिवसांतच एसटीच्या 2 हजाराहून अधिक बस आरक्षित झाल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्यांची संख्या अधिक असते. यंदा 7 सप्टेंबर रोजी गणपती येत आहेत. त्यापूर्वीच भाविक कोकणात जाण्याची लगबग करत असतात. प्रवाशांची ही लगबग पाहून एसटी आणि रेल्वे प्रशासनाने जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वेनेही फेस्टिव्ह ट्रेन सोडल्या आहेत. तर, एसटीनेही जादा गाड्या सोडल्या आहेत. मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्यातून कोकणात जाणाऱ्या नागरिकांनी एसटीला पसंती दिली आहे. त्यामुळं एसटीच्या 1,301 बसच्या गट आरक्षणासह एकूण 2,031 जादा बस आत्तापर्यंत पूर्ण आरक्षित झाल्या आहेत. 


गणेशोत्सवासाठी एसटी महामंडळाने यंदा 2 ते 7 सप्टेंबर दरम्यान 4300 जादा एसटी बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. व्यक्तिगत आरक्षणाबरोबरच गट आरक्षणामध्ये अमृत ज्येष्ठ नागरिकांना 100 टक्के, ज्येष्ठ नागरिकांना व महिलांना 50 टक्के तिकिट दरात सवलत दिली जात आहे. २ सप्टेंबर पासून मुंबई, ठाणे, पालघर, या विभागांतील प्रमुख बसस्थानकातून या जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत.


 यंदा एसटीतर्फे सुमारे ४,३०० जादा बस सोडण्यात येणार असून त्यापैकी २,०३१ बसचे पूर्ण आरक्षण झाले आहे. गणेशभक्तांसाठी विविध सुविधादेखील यंदा करण्यात  आल्या आहेत.गणेशभक्तांचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून २ ते ७ सप्टेंबर या काळात बस स्थानक व बस थांब्यांवर एसटीच्या वरिष्ठ अधिका-यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार आहेत, तसेच कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी वाहनदुरुस्ती पथकदेखील तैनात करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर प्रवाशांना नैसर्गिक विधीसाठी तात्पुरत्या स्वरूपाची प्रसाधनगृहे उभारण्यात येणार आहेत.


इथं करता येणार बुकिंग


यंदा सुमारे 4,300 जादा गाड्या कोकणातील रस्त्यावर धावतील. या बसेसचे आरक्षण npublic.msrtcors.com या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. शिवाय बसेसचे आरक्षण बसस्थानकावर किंवा महामंडळाच्या MSRTC Bus Reservation ॲपव्दारे उपलब्ध होणार आहे.