नादुरुस्त शिवशाहीमध्ये चालकाने संपवले आयुष्य; आता समोर आले खळबळ उडवणारे कारण, महिला वाहक....
ST Shivshahi Bus Driver Suicide In Nashik: तीन दिवसांपूर्वी नाशिक शिर्डी मार्गावर वावीजवळ आत्महत्येची घटना घडली होती. यामध्ये पंधरा दिवसांपूर्वी मोठ्या मुलाचा विवाह झालेला असताना चालक राजेंद्र ठुबे याने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली होती
ST Shivshahi Bus Driver Suicide: नादुरुस्त झालेल्या शिवशाही एसटी बसमध्ये (Shivshahi ST Bus) चालकानं आत्महत्या केल्याचा प्रकार दोन दिवसांपूर्वी उघडकीस आला होता. नाशिकमध्येही (Nashik) घटना घडली होती. आता या प्रकरणात धक्कादायक खुलासा समोर आला आहे. एसटी बसच्या चालकाच्या आत्महत्येचे कारण समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
आत्महत्येचं खरं कारण समोर
नादुरुस्त असलेल्या शिवशाही बस मध्ये चालकाने केलेली आत्महत्या ही महिला वाहकाच्या जाचामुळे केल्याचा समोर आलं आहे. चालक राजेंद्र ठुबे असं आत्महत्या केलेल्या चालकाचे नाव आहे. या प्रकरणात महिला वाहकाचे नाव समोर आल्याने वेगळीच चर्चा रंगली आहे.
नादुरुस्त बसमध्येच आत्महत्या
राजेंद्र ठुबे यांनी तीन दिवसांपूर्वी नाशिक शिर्डी मार्गाजवळ वावीजवळ आत्महत्या केली आहे. बसच्या पाठच्या सीटवर त्यांनी गळफास घेऊन जीवन संपवले होते. एसटी महामंडळातील महिला वाहकांची दादागिरी आणि त्यातून आर्थिक कुचंबणेतून हा प्रकार घडला असल्याचे समोर आलं आहे. ठुबे यांच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीवरुन या प्रकरणाचा तपास लागला आहे.
पंधरा दिवसांपूर्वी झाला होता मुलाचा विवाह
पंधरा दिवसांपूर्वी राजेंद्र ठुबे यांच्या मोठ्या मुलाचा विवाह झाला होता. घरात नवीनच लग्नकार्य झाल्यानंतरही त्यांनी असं टोकाचं पाऊल का उचललं? असा प्रश्न त्यांच्या नातेवाईकांमध्ये व सहकाऱ्यांमध्ये चर्चिला जात होता. मात्र, आता खरे कारण समोर आल्यानंतर त्यांनाही धक्का बसला आहे.
मुलाने व्यक्ती केली होती शंका
एसटी महामंडळातील अधिकाऱ्यांच्या जाचामुळं व आर्थिक कुचंबणा होत असल्याने त्यांनी आत्महत्येचं पाऊल उचललं असल्याची शक्यता त्यांच्या मुलाने उपस्थित केली होती. तसंच, सतत व्यवस्थापनेकडून होत असलेला छळ यामुळंही ते त्रस्त होते, असंही त्याने म्हटलं होतं. या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीची मागणीही त्याने केली होती.
तीन चाकांवर चालली एसटी
गोंदियातही एसटीसोबत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. भरधाव एसटी बसचा टायर निखळून शेतात गेला. त्यावेळी एक्त तीन चाकांवरच काही अंतरापर्यंत चालकाने एसटी फरफटत नेली. त्यानंतर चालकाने प्रसंगावधान दाखवत एसटी एका बाजूला नेत थांबवली. यामुळं कोणतीही जिवितहानी झाली नसली तरी प्रवाश्यांनी संताप व्यक्त केला आहे. मोठा अपघात टळल्याचं प्रवासी सांगत आहेत. तर, काही प्रवासी किरकोळ जखमी झाल्याचंही प्रवासी सांगत आहेत.
सांगलीत एसटीचा व्हिडिओ व्हायरल
सांगली जिल्ह्यातही एक एसटीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात धावत्या एसटीची स्टेअरिंग चालकाच्या हातात आहे. तर महिला कंडक्टरच्या हातात अॅक्सेलेटरची दोरी आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने प्रवासी संताप व्यक्त करत आहेत.