राज्यातील आणखी एका मंत्र्यांची कोरोनावर यशस्वी मात
योग्य उपचार आणि जनतेच्या शुभेच्छांमुळे लवकर बरे होण्यास मदत
मुंबई : संपूर्ण जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसचा विळखा भारताला आणि महाराष्ट्रालाही बसल्याचं पाहायला मिळालं. अगदी राज्यातील मंत्रीसुद्धा या विळख्यापासून सुरक्षित राहू शकले नाहीत. महाविकासआघाडी सकारमधील अनेक मंत्र्यांना कोरोनाची लागण झाल्याचं वृत्त होतं. यापैकील जवळपास साऱ्यांनीच या विषाणूच्या संसर्गावर मात केली. यात आता आणखी एका नावाचा समावेश झाला आहे. हे नाव म्हणजे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचं.
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून, सोमवारी त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं. जनतेचं प्रेम आणि सर्वांच्या शुभेच्छांसोबतच या काळात योग्य आहार, योगसाधना, प्राणायाम, ध्यानधारणा आणि वाचन यांमुळे लवकर बरं होण्यास मदत झाली असल्याचं त्यांनी सांगितलं.
कोरोना रुग्णांच्या संपर्कात
मराठवाडा मुक्ती दिन कार्यक्रमाच्या निमित्तानं त्या नांदेड, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांच्या दौऱ्यावर होत्या. यादरम्यान त्या कोरोना रुग्णाच्या संपर्कात आल्या होत्या. दिनांक २१ सप्टेंबर रोजी त्यांना ताप आल्यामुळे कोविड-१९ ची टेस्ट करुन घेतली असता अहवाल पॉझिटीव्ह आला होता. त्यानंतर त्यांनी ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल होऊन कोरोनासाठीचे उपचार घेतले. ज्यानंतर काही दिवसांतच त्यांना रुग्णालयातून रजा देण्यात आली.
कोविड -१९ चं निदान झाल्यानंतर योग्य ते उपचार घ्यावेत, सकारात्मक भावना ठेऊन ध्यान धारणा करावी. तसंच आपल्यामुळं इतरांना प्रादुर्भाव होणार नाही याची काळजीही घ्यावी असं आवाहन कोरोनातून सावरलेल्या वर्षा गायकवाड यांनी केलं.