आशीष अम्बाडे, झी 24 तास, गडचिरोली : विकास कामावर निधी खर्च करताना गुणवत्तापुर्ण कामे व्हावीत याची दक्षता घेण्यात यावी असे आवाहन गडचिरोली जिल्ह्याचे नवनियुक्त पालकमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गडचिरोलीत केले. गडचिरोली जिल्हावासियांची सेवा करण्याची संधी मिळाली आहे याची जाणीव ठेवून अधिकाऱ्यांनी कामाची गती वाढवावी असे निर्देश मुनगंटीवार यांनी आपल्या पालकमंत्री पदभार स्वीकारल्यावर पहिल्या आढावा बैठकीत दिले. सुधीर मुनगंटीवार पालकमंत्री हवेत अशी गडचिरोलीकरांची गेली काही वर्षे मागणी होती. ती पूर्ण झाल्याने गडचिरोली जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी त्यांच्या प्रथम आगमनाप्रीत्यर्थ जोरदार स्वागत केले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुनगंटीवार यांनी शासकीय कृषी महाविद्यालयात आयोजित जांभुळ-रानभाजी महोत्सवाला भेट देत कृषी क्षेत्रातील विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला. जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेल्या विविध विभागांच्या आढावा बैठकीत मुनगंटीवार यांनी संजय गांधी निराधार योजनेच्या अनुदानाची रक्कम नुकतीच वाढविली आहे. सर्व निराधार व्यक्तींच्या खात्यात ती रक्कम यथाशिघ्र जमा करावी. यात हयगय करु नये असे निर्देश देत असतांनाच जिल्ह्यातील रस्त्यांच्या बांधकामाकडे विशेषत्वाने लक्ष घालून चांगली यंत्रणा निश्चित करण्याच्या सूचना दिल्या. 


कृषी, सार्वजनिक बांधकाम, पोलिस आणि जिल्हा परिषद येथील राबवित असलेल्या विकास कामाचा आढावा त्यानी घेतला. विविध विभागातील रिक्त पदे विकास कामे करीत असतांना अडचणी  निर्माण करतात. त्या भरण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.  जिल्हा स्टेडीयम, तालुका स्टेडीयम, चामोर्शी बस स्टँड, मार्कंडा मंदीर विकास आराखडा अशा विकास कामाचे सादरीकरण पुढील बैठकीत सादर करण्याच्या सुचना पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या. 



दुर्गम भागात रस्ते बांधकामाकरीता छत्तीसगडच्या धर्तीवर जिल्हा निर्माण समिती गठीत करून प्रकल्प मार्गी लावण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. चंद्रपूर जिल्ह्याच्या धर्तीवर पालकमंत्री तक्रार निवारण हेल्पलाईन उभारण्याची सूचना त्यांनी बैठकीत केली. नक्षलवाद राज्यासाठी भूषणावह नसून तो शून्यावर आणण्यासाठी सर्वशक्तीनिशी कार्यरत राहू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.