दूध दरवाढ आंदोलन: सरकारच्या कथनी व करणीत फरक - अजित पवार
सरकारच्या कथनी व करणीत फरक असल्यामुळे दूध आंदोलन पेटले, असेही अजित पवार म्हणाले.
नागपूर: दूध दरवाढीच्या मुद्द्यावर राज्य सरकारनं तातडीनं तोडगा काढावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी विधान सभेत केली. दुधाच्या भूकटीला ५० रुपये अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला असला तरी, त्याचा फायदा दूध उत्पादक शेतकऱ्यांना होणार नसल्याचं अजित पवार यांनी सांगीतलं.
सरकारच्या कथनी व करणीत फरक
उत्पादक शेतकऱ्यांना दूध उत्पादनासाठी प्रती लीटर २५ ते३० रुपये खर्च होतो. मात्र, शेतकऱ्यांना १७ ते २० रुपये लीटरने दूधाची विक्री करावी लागते. यावर सरकारने तोडगा काढावा अशी मागणी अजित पवार यांनी केली. सरकारच्या कथनी व करणीत फरक असल्यामुळे दूध आंदोलन पेटले असून, त्याला काँग्रेस पक्षाचा संपूर्ण पाठिंबा आहे. दूधाच्या प्रश्नावर आज आम्ही विधानसभेत नियम ५७ व ९७ अंतर्गत स्थगन प्रस्तावाची सूचना दिलेली आहे, असेही अजित पवार म्हणाले.
...तर, सरकारला किंमत मोजावी लागेल
दरम्यान, सरकारने बळाचा वापर करुन दूध उत्पादकांचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करु नये किंवा तशी धमकीही देऊ नये. राज्यात शेतकऱ्यांवर दडपशाही झाली तर त्याची जबर किंमत सरकारला मोजावी लागेल, हे सरकारने ध्यानात ठेवावे, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे.