मुंबई : वैद्यकीय शाखेतील प्रवेशात आरक्षणापासून वंचित राहणार्‍या मराठा विद्यार्थींच्या फी चा भार राज्य सरकार उचलणार आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाला स्थगिती असतानाही वैद्यकीय शाखेतील प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला अधीन राहून प्रवेश प्रक्रिया सुरू करणार असल्याची माहीती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वैद्यकीय शाखांचे शैक्षणिक वेळापत्रक पाळावे लागते. त्यामुळे प्रवेश प्रक्रिया सुरू करावी लागेल. आरक्षणाचा लाभ न मिळाल्याने ज्यांचे नुकसान होणार आहे, त्यांचे नुकसान होऊ नये यासाठी पर्यायांवर चर्चा सुरू असल्याचे देशमुख म्हणाले. 


यापूर्वी जेव्हा असे झाले होते त्यावेळी अशा विद्यार्थ्यांची फी सरकारने भरली होती. आताही त्या पर्यायावर विचार सुरू असून मंत्रीमंडळापुढे वैद्यकीय शिक्षण विभाग त्याबाबत प्रस्ताव मांडणार आहे. मराठा आरक्षण स्थगिती आहे, त्यामुळे सगळी प्रवेश प्रक्रिया थांबवता येणं शक्य नाही. 



आरक्षणाचा लाभ मिळाला असता तर जेवढी फी द्यावी लागली असती तेवढीच फी द्यावी लागणार आहे. अतिरिक्त भार सरकार उचलणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. वैद्यकीय शिक्षण विभागातर्फे तसा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. आरक्षण मिळाल्यास जो फायदा झाला असता तोच फायदा आता विद्यार्थ्यांना देणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले.