मुंबई : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या अटकेचे वृत्त धडकताच राज्यात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. राज्यातील विविध भागात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या गृहमंत्रालयाने संवेदनशील भागात अलर्ट जारी केले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंत्री नबाव मलिक (Nawab Malik) यांना सकाळी अटक होताच राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांनी सकाळपासूनच मुंबई प्रदेश कार्यालयासमोर जमले होते. यावेळी त्यांनी ईडीविरोधात घोषणा दिल्या. तसेच, आम्ही येत आहोत,जमल्यास रोखून दाखवा असे आव्हानही ईडी अधिकाऱ्यांना दिले होते. 


त्यानंतर सात तासाच्या चौकशीनंतर मंत्री मलिक यांना अटक करण्यात आली आणि राज्यात राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये संताप पसरला. मुंबई पाठोपाठ पुणे, मालेगाव, नाशिक, उस्मानाबाद येथे कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.


पुण्यात राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी राणी झाशी चौकात आंदोलन केले. यावेळी त्यांनी केंद्र सरकार आणि ईडीविरोधात जोरदार घोषणा दिल्या. उस्मानाबाद येथे कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ईडी व केंद्रसरकार विरोधात घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन केले. यावेळी त्यांनी प्रतिकात्मक पुतळा फोडला.


जळगाव येथेही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. भाजपचा याप्रसंगी निषेध करण्यात आला. राज्यता ठिकठिकाणी होणाऱ्या या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्रालयाने आंदोलन आणि त्यावर उमटणारे पडसाद यावर खबरदारी घेण्याच्या सूचना पोलिसांना केल्या आहेत.