चिंता वाढली : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या ८ हजारांपार
सोमवारी हाती आलेल्या नव्या आकडेवारीनुसार ....
मुंबई : जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूची दहशत भारतात दिवसागणिक वाढतच आहे. देशात वाढणाऱ्या कोरोना रुग्णांसमवेत राज्यात, म्हणजेच महाराष्ट्रातही परिस्थिती चिंताजनक असल्याचं पाहायला मिळत आहे. सोमवारी हाती आलेल्या नव्या आकडेवारीनुसार राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा ८ हजारांच्या पलीकडे गेला आहे.
सध्याच्या घडीला राज्यात ८,०६८ कोरोना रुग्ण असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन सातत्याने करण्यात येत आहे. मागील २४ तासांमध्ये राज्यात ४४० नवे कोरोना रुग्ण आढळून आले. यामध्ये मुंबईसह इतर काही हॉटस्पॉटमधील रुग्णांचा समावेश आहे.
आतापर्यंत कोरोनामुळं राज्यात जवळपास ३४२ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर, ११८८ रुग्ण हे उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. या परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी आता प्रशासनही काही कठोर पावलं उचलताना दिसत आहे.
एकिकडे राज्यात परिस्थिती तणावाच्या वळणावर असतानाच दुसरीकडे देशातही चित्र वेगळं नाही. आतापर्यंत देशातही कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून, या विषाणूच्या संसर्गामुळं देशातील ८२६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, ५९१४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
कोरोना विषाणूची लागण झाल्यानंतर, त्यावर योग्य उपचार घेत या विषाणूवर मात करणाऱ्यांचा आकडा देशात दिलासा देणारा असला तरीही व्हायरसचा होणारा प्रसार आणि झपाट्याने वाढणारा संसर्ग मात्र प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेपुढे काही आव्हानं उभी करत आहे हे नाकारता येत नाही.