Investigation Report : आकाशात ढग जमा झाले की शेतकऱ्यांना वेध लागतात ते खरीप हंगामाचे.  मराठवाड्यात मशागतीची 80 टक्के कामं पूर्णही झाली आहेत. अशा वेळी खतं आणि बियाणांची टंचाई भासू लागल्यामुळे बळीराजाच्या पायाखालची वाळू सरकलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यामुळे विक्रेत्यांचं फावलं असून लिंकिंगमध्ये विक्री सुरू आहे. शेतकऱ्यांना एक पोतं डीएपी खत घ्यायचं असेल तर त्याबरोबर 475 रुपयांचं सल्फर गळ्यात मारलं जातंय. झी 24 तासनं केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये याचा पर्दाफाश झालाय. आणखी धक्कादायक बाब म्हणजे हे विक्रेते गेल्यावर्षीचं पोतं यंदाच्या चढ्या दरानं शेतकऱ्यांना विकतायत.


खतांची टंचाई असल्यानं शेतकऱ्यांची खुलेआम लूट सुरू आहे. मराठवाड्यात गतवर्षीचं 3 लाख 50 हजार 38 मेट्रिक टन खत विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आलंय.  कृषी विभागानं यंदाच्या हंगामासाठी 16 लाख 52 हजार 522 मेट्रिक टनांची मागणी नोंदवली आहे. 
यापैकी 12 लाख 71 हजार 964 मेट्रिक टनांचं वाटप मंजूर झालंय. मात्र मे महिना संपत आला असताना अद्याप 3 लाख 68 हजार 875 मेट्रिक टन खत येणं बाकी आहे. 


मराठवाड्यात कृषी विभागानं भरारी पथकं नेमली असतानाही शेतकऱ्यांची उघडउघड लूट सुरू आहे. सरकारनं या गैरप्रकारांची गंभीर दखल घेऊन बळीराजाला लुबाडणाऱ्यांना चांगली अद्दल घडवायला हवी, अशी मागणी शेतकरी करतायत.