रत्नागिरी : परतीच्या पावसाने जोरदार फटका दिला आहे. सलग पावसामुळे रत्नागिरीतल्या भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. तर मासेमारी पूर्णत: बंद आहे. वादळामुळे नौका बंदरात उभ्या करण्यात आल्या आहेत. मुंबई तसेच गुजरात राज्यातील अनेक नौका या रत्नागिरी जिल्ह्यातील ठिकठिकणच्या बंदरात उभ्या करण्यात आल्या आहे. त्यामुळे मासेमारी व्यवसायावर मोठा परिणाम दिसून येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोकणातली भात शेती पाण्याखाली आहे. ४० टक्के पिकांच पावसामुळे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.  पाण्यात भिजत असलेलं, कापलेलं भातही शेतकरी उचलतोय. ज्या भात  शेतीवर कोकणाचं अर्थकारण वर्षभर चालतं तेच पीक आता पावसामुळे जमीनदोस्त झाले आहे. त्यामुळे भविष्यात खायचे काय, असा सवाल त्यांना भेडसावत आहे. राज्य शासनाकडून तात्काळ नुकसानीचे पंचनामे करण्यात यावेत, अशी मागणी होत आहे. 


गेल्या तीन दिवसांपासुन नौका बंदरातच उभ्या आहेत. वादळ आणि मुसळधार पावसामुळे समुद्र खवळला असून, मच्छीमारी पूर्णतः ठप्प झाली आहे. मुंबई, हर्णैसह गुजरातमधील शेकडो नौका तालुक्‍यातील जयगड, लावगण किनाऱ्यांवर आश्रयासाठी आलेल्या आहेत. तर मुंबई, गुजरात व अन्य राज्यातील बोटी जयगड खाडीतील साखर मोहल्ला बंदरात, तवसाळ, पडवे बंदरात आश्रयाला आल्या आहेत.