थंडीमुळे `स्ट्रॉबेरी` बहरली!
जगभरातील स्ट्रॅाबेरी उत्पादनात अग्रेसर असलेल्या महाबळेश्वरमध्ये यावर्षी अडीच ते तीन हजार एकर क्षेत्रावर स्ट्रॅाबेरीची लागवड करण्यात आली आहे. हा स्ट्रॉबेरीचा दुसरा हंगाम सुरु असून महाबळेश्वरमधून दररोज ७० टन स्ट्रॅाबेरीचं उत्पादन होत आहे.
विकास भोसले, झी मीडिया, सातारा : जगभरातील स्ट्रॅाबेरी उत्पादनात अग्रेसर असलेल्या महाबळेश्वरमध्ये यावर्षी अडीच ते तीन हजार एकर क्षेत्रावर स्ट्रॅाबेरीची लागवड करण्यात आली आहे. हा स्ट्रॉबेरीचा दुसरा हंगाम सुरु असून महाबळेश्वरमधून दररोज ७० टन स्ट्रॅाबेरीचं उत्पादन होत आहे.
सध्या राज्यभर थंडीचा कडाका वाढला असून त्याचा परिणाम इथल्या स्ट्रॉबेरीवर पाहायला मिळतोय. सध्या स्ट्रॉबेरीचा दुसरा बहर सुरू झाला आहे. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरसह अन्य तालुक्यात मोठ्या प्रमाणात स्ट्रॉबेरीचं उत्पादन होत आहे. सध्या दिवसाकाठी ६५ ते ७० टन स्ट्रॉबेरीची विक्री होत आहे.
सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर तालुक्यासह जावळी, वाई, कोरेगाव, आणि सातारा या तालुक्यात परतीच्या पावसामुळे स्ट्रॉबेरीच्या क्षेत्रात काही प्रमाणात घट झाली आहे. यंदा महाबळेश्वर तालुक्यात सार्वधिक २५०० एकरावर स्ट्रॉबेरीची लागवड झाली आहे, तर अन्य तालुक्यांत सुमारे एक हजार एकर, असे एकूण साडेतीन हजार एकर क्षेत्रावर स्ट्रॉबेरीची लागवड झाली आहे.
स्ट्रॉबेरी हे थंडीच्या हंगामत येणारं फळ असल्याने त्याचा मुख्य बहर डिसेंबर, जानेवारी महिन्यात येतो. त्यामुळं या महिन्यात मोठ्या प्रमाणात स्ट्रॉबेरीचं उत्पादन होतं. वाढत्या थंडीमुळं स्ट्रॉबेरीवर कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात झाला आहे. हंगामाच्या सुरवातीस आलेली स्ट्रॉबेरी आकाराने मोठी व चवीला उत्तम असल्याने त्यास बाजारात मोठी मागणी असते. महाबळेश्वरच्या वेन्ना लेक आणि लिंगमळा परिसरातील स्ट्रॉबेरी इतर भागात उत्पादीत होणाऱ्या स्ट्रॉबेरीच्या तुलनेत अधिक सरस असल्याचा इथल्या शेतकऱ्यांचा दावा आहे.
महाबळेश्वर तालुक्यातील स्ट्रॉबेरी मुंबई आणि पुण्यासह बेंगळूर, हैदराबाद, कोलकता, रांची या शहरांत विक्रीसाठी पाठवली जाते. सध्या इथल्या स्ट्रॉबेरीला चांगला दर मिळतोय. नाताळच्या सुट्यामुळं महाबळेश्वरमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती. त्याचा फायदा शेतकऱ्यांनी घेतला. त्यांनी व्यापाऱ्यांना स्ट्रॉबेरी विकण्याऐवजी थेट पर्यटकांना स्ट्रॉबेरीची विक्री करण्यावर भर दिला.
यंदा जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे स्ट्रॉबेरी लागवडीस उशीर झाल्याने हंगामही उशिरा सुरू झाला आहे. तसेच स्ट्रॉबेरीच्या दुसऱ्या बहरातील उत्पादनात २० ते २५ टक्के घट झाली आहे. स्ट्रॉबेरी उत्पादनाचा हा हंगाम एप्रिल आणि मे महिन्यांपर्यंत सुरू राहण्याची शक्यता आहे.