प्रफुल्‍ल पवार, रायगड : लाच चुटूक, रशरशीत स्ट्रॉबेरी म्हटली की चटकन डोळ्यासमोर येतं ते महाबळेश्वर. मात्र, कोकणच्या मातीतही स्ट्रॉबेरी पिकते असं जर कुणी सांगितलं तर तुमचा विश्वास बसेल का? नाही ना, पण महाडच्या गणेश खांबे यांनी रायगडातही स्ट्रॉबेरीचं पीक येऊ शकतं हे दाखवून दिलं आहे. भाताचे कोठार म्हणून प्रसिद्ध असलेल्या रायगडात पारंपारिक भातशेती धोक्यात आली आहे. त्यामुळे नवीन पीकं घेऊन शेती वाचवण्यासाठी कृषी विभाग प्रयत्न करतं आहे. चांभारखिंड येथील गणेश खांबे यांनी आपल्‍या शेतात स्ट्रॅाबेरीची लागवड केली. सावित्री नदी काठी असलेल्या शेतामध्‍ये स्‍ट्रॉबेरीचा मळा फुलवला. खांबे यांच्‍या शेतातील लालचुटुक स्‍ट्रॉबेरी इथल्‍या खवययांच्‍या पसंतीस उतरली आहे आणि यातून त्यांना चांगलं उत्‍पन्‍न मिळतं आहे.


महाबळेश्वरला गेलेले पर्यटक अशी रसरशीत स्ट्रॉबेरी घेऊन येताना दिसतं. परंतु आता हे चित्र बदलतं आहे. आता रायगडातही स्ट्रॉबेरी बहरली आहे. स्ट्रॉबेरीसाठी थंड हवामान व भरपूर पाणी लागते. खांबे यांनी या शेतीला पाणी देण्‍यासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब केला. वींटर डाऊन, स्विट सेंन्सेन, एलीना, सॅन अॅन्ड्रीयाज अशा जाती कोकणच्‍या लाल मातीत चांगलं उत्‍पन्‍न देवू शकतात. असं कृषी अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. कोकणातील शेती आतबट्ट्याची होत चालली आहे. अशा परीस्थितीत कमी खर्चात चांगलं उत्‍पन्‍न देणारी स्‍ट्रॉबेरीची शेती हा कोकणातल्या शेतकऱ्यांसाठी चांगला पर्याय ठरतो आहे.