`...तर दोन पायांवर जाऊ देणार नाही`; लव्ह जिहाद कायद्यावरुन नितेश राणेंचा इशारा
love jihad Act : पुण्यातील मुंढवा भागात लव्ह जिहादची घटना घडल्याप्रकरणी सकल हिंदू समाजाच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाचे नेतृत्त्व भाजपाचे नेते आमदार नितेश राणे यांनी केले. यावेळी पावसाळी अधिवेशनात लव्ह जिहाद विरोधात कडक कायदा येणार असल्याचे नितेश राणे यांनी सांगितले.
सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद’चा (love jihad) मुद्दा दिवसेंदिवस जोर धरू लागला असून, यासंदर्भात राज्यातील नेत्यांमध्येही जोरदार वाद सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच पुण्यातील मुंढवा भागात राहणार्या तरुणीसोबत लव्ह जिहादची घटना घडल्या प्रकरणी सकल हिंदू समाजाच्या वतीने रविवारी निषेध मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व भाजपचे (BJP) नेते आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केले. मुंढवा येथील धर्मवीर छत्रपती संभाजी राजे चौक ते जय हिंद चौक घोरपडी दरम्यान मोर्चा काढत निषेध नोंदवण्यात आला आहे. यावेळी पावसाळी अधिवेशनात (monsoon session) लव्ह जिहाद विरोधात कडक कायदा येणार असल्याचे सूचक वक्तव्य नितेश राणे यांनी केले आहे.
"लव्ह जिहाद बाबत कायदा हा काय खिश्यातून चिठ्ठी काढण्या इतका सोपा नसून त्या कायद्यासाठी अभ्यास करावा लागतो. अनेक राज्यात लव्ह जिहाद विरोधात कायदा असून त्याचा अभ्यास केला जात आहे.गेल्या अधिवेशनात याबाबत विचार झाला असून प्राथमिक माहिती ही सादर देखील करण्यात आली आहे. कदाचित या पावसाळी अधिवेशनात देशातील सर्वात कडक आणि प्रभावशाली धर्मांतर विरोधी कायदा महाराष्ट्रात येईल. तशी आमची तयारीसुद्धा आहे," असे नितेश राणे यांनी म्हटलं आहे.
...तर दोन पायांवर जाऊ देणार नाही
"महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींकडून लव्ह जिहाद होत नाही, धर्मांतरण होत नाही या सगळ्या खोट्या अफवा पसरवल्या जात आहेत. जिहादींना कळायला हवं की राज्याचा गृहमंत्री आता बदललेला आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार राहिलेलं नाही. यापुढे कोणत्याही हिंदूंना घाबरवण्याचा प्रयत्न केला तर त्याला काय आम्ही परत दोन पायांवर जाऊ देणार नाही. कायदा त्याचे काम करेल. पोलिसांकडे आम्ही सगळ्या पद्धतीचा पाठपुरावा करु. हे हिंदुत्ववादी विचारांचे सरकार आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे हिंदुत्ववादी विचारांचे आहेत. या राज्यात हिंदुवर अन्याय होणार नाही एवढी काळजी आम्ही घेणार आहोत," असेही नितेश राणे म्हणाले.
शाहरुख खानच्या मुलाची चिंता करणार्या ताई पीडित मुलींची भेट घेणार का?
"पुण्यातील मंचर आणि मुंढवा येथील अल्पवयीन तरुणीसोबत मुस्लिम तरुणांकडून अन्याय अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील काही ताई म्हणतात की, लव जिहाद, धर्मांतर या सारख्या घटना घडत नाही. मी त्या ताईंना एक विचारू इच्छितो की, ताई तुला शाहरुख खानच्या मुलाची चिंता आहे, या पीडित मुलींची चिंता करून भेट घेणार का?" असा सवालही नितेश राणे यांनी विचारला आहे.