नागपूर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आता नागपुरात देखील निर्बंध लागू होत आहेत. नागपुरात कडक नियमावली लागू करणार असल्याचं मंत्री नितीन राऊत यांनी म्हटलं आहे. महत्त्वाचं म्हणजे 7 मार्चपर्यंत नागपुरातील आठवडी बाजार बंद राहणार आहेत. शाळा, कॉलेज,कोचिंग क्लासेस 7 मार्चपर्यंत पूर्णपणे बंद राहतील. तर हॉटेल रात्री 9 नंतर बंद राहणार असून फक्त 50 टक्के लोकांनाच परवानगी देण्यात येणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागपुरात कोरोनाचं संक्रमण पुन्हा झपाट्यानं वाढत चाललं आहे. या पार्श्वभूमीवर आज पालकमंत्री नितीन राऊत आढावा बैठक घेतली. या बैठकीत काही कठोर पावलं उचलण्यात आली आहेत. गेल्या काही दिवसांत नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या वेगानं वाढते आहे. गेल्या तीन दिवसांत तर दोन हजारांपेक्षा अधिक रुग्ण सापडले आहेत. मात्र दुसरीकडे नागपूरकर अजूनही कोरोनाबाबतच्या नियमांचं पालन करताना दिसतन नाहीयेत.


मंगल कार्यालय 25 फेब्रुवारी ते 7 मार्चपर्यंत बंद राहणार आहेत. तसेच धार्मिक कार्यक्रम आणि राजकीय कार्यक्रमांवर देखील बंदी असणार आहे. अमरावती नंतर आता नागपुरात ही निर्बंध लागू करण्यात आले आहेत.


50 पेक्षा कमी लोकांच्या उपस्थितीत घरी लग्नकार्य करता येणार आहे. मंगल कार्यालयांमध्ये 7 मार्च पर्यंत लग्न सोहळे होणार नाहीत. बंद करण्यात आलेले कोविड सेंटर सुरू करणार आहेत. आरोग्य पथकाच्या गृहभेटी संख्या वाढवणार असून नवीन हॉटस्पॉट शोधून कंटेंमेंट झोन निश्चित केले जाणार आहेत.