रत्नागिरी : जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली. सलग पाच तासांपेक्षा जास्त पाऊस झाल्याने बळीराजा चांगलाच सुखावला आहे. राजापूर, लांजा, संगमेश्वर आणि रत्नागिरी तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळला. वायू चक्रीवादळामुळे गायब झालेल्या मान्सूनपूर्व पावसाची शेतकरी चातकासारखा वाट बघत होता. तसेच रत्नागिरीत तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. एकदिवसाआड शहराला पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तसेच शहर परिसरात अनेक ठिकांनी पैसे मोजून वसाहती टॅंकर मागवत आहेत. त्यामुळे या पावसामुळे थोडासा दिलासा मिळाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वायू चक्रीवादळामुळे लांबलेला पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. बुधवारी दिवसभर जिल्ह्यात पावसाच्या दमदार सरी कोसळत होत्या. काही ठिकाणी तर मुसळधार पाऊस  झाला. यामुळे जिल्ह्यात मान्सून सक्रीय झाल्याचे जाणवत होते. गेल्या आठवड्यात पूर्व मोसमी पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांबरोबर टंचाईग्रस्त भागातील ग्रामस्थांना थोडासा दिलासा मिळाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून पाऊस गायब झाला होता. मात्र, काल पहाटेपासून पावसाला सुरुवात झाल्याने हवेत चांगलाच गारवा निर्माण झाला होता.


गेल्यावर्षी रत्नागिरी जिल्ह्यात 1 जून ते 19 जून दरम्यान 5065.51 मिमी पाऊस झाला होता. याच कालावधीत यावर्षी केवळ 1398 मिमी पाऊस झाला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, काल कोसळलेल्या पावसामुळे अनेक भागात विद्युतपुरवठा खंडित झाला होता. तर रत्नागिरी शहरात विजेचा लपंडाव सुरुच होता.