मुंबईत टॅब पुण्यात कटोरा, शिवसेनेच्या भीकमांगो आंदोलनात विद्यार्थी
मुंबईमध्ये सत्ता असलेल्या शिवसेनेनं महापालिका शाळांच्या विद्यार्थ्यांना टॅबचं वाटप केलं पण पुण्यात मात्र शिवसेनेनं शालेय विद्यार्थ्यांच्या हातात कटोरा दिला आहे.
पुणे : मुंबईमध्ये सत्ता असलेल्या शिवसेनेनं महापालिका शाळांच्या विद्यार्थ्यांना टॅबचं वाटप केलं पण पुण्यात मात्र शिवसेनेनं शालेय विद्यार्थ्यांच्या हातात कटोरा दिला आहे. पुण्यामध्ये शिवसेनेनं केवळ आंदोलनात नाही तर उतरवलं तर त्यांना रस्त्यात भीक मागायला लावली.
महापालिकेच्या कर्जरोख्यांविरोधात शिवसेनेनं एल्गार पुकारलाय. भाजप महापालिकेला कर्जबाजारी करणार असल्याचा शिवसेनेचा आक्षेप आहे. त्यासाठी शिवसेनेनं विद्यार्थ्यांना रस्त्यात भीकमांगो आंदोलनासाठी उतरवलं.
पुण्यात पाणीपुरवठा योजनेसाठी महापालिका कर्जरोख्याच्या माध्यमातून निधी उभारणार आहे, याला शिवसेनेचा विरोध आहे. मात्र हा विरोध करताना शिवसेनेनं थेट शाळकरी मुलांना आणून त्यांना भीक मागायला लावली. विद्यार्थ्यांकडून असं आंदोलन करून घेण्याबाबत चर्चा सुरू झाल्यावर मात्र शिवसेना नेते बॅकफूटवर गेले. हे विद्यार्थी इथे आपणहून आल्याचा अजब दावा त्यांनी केला.
विद्यार्थी स्वतःहून आंदोलनात सहभागी झालेत असं म्हणणाऱ्या शिवसेनेचा हा अजब दावा काही सेकंदातच फोल ठरला. नेमकं आंदोलन कशासाठी सुरू आहे, आपण नक्की काय करत आहोत याची कोणतीही कल्पना विद्यार्थ्यांना नव्हती.