चप्पल शिवणाऱ्या बापाचं स्वप्न केलं पूर्ण! पोलीस ठाण्याच्या वाचनालयात अभ्यास करुन लेक झाली PSI
Success Story : चप्पल जोडे शिवणाऱ्याची मुलगी आता होणार पोलीस उपनिरीक्षक होणार आहे. कोणतेही शिकवणी वर्ग न लावता गोंदियाच्या खुशबूने मोठं यश संपादन केले आहे. पोलीस ठाण्याच्या वाचनालयात अभ्यास करत खुशबू ही परीक्षा पास झाली आहे.
प्रविण तांडेकर, झी मीडिया, गोंदिया : जीवनात कोणत्याही ध्येय प्राप्तीसाठी मनात प्रचंड आत्मविश्वास, जिद्द असणे आवश्यक आहे. अशाच एका गोंदियाच्या तरुणीने स्पर्धा परीक्षेत मिळवलेल्या यशामुळे सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले आहे. गरीबीत जीवन जगणाऱ्या खुशबू प्रल्हाद बरैय्या (Khushboo Baraiya) या 25 वर्षीय युवतीने स्पर्धा परीक्षेसाठी कोणतीही शिकवणी वर्ग न लावता गावात राहून नियमित अभ्यास करून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. खुशबूच्या अथक परिश्रमाला अखेर यश येऊन चप्पल-जोडे शिवणाऱ्याची मुलगी आता पोलीस उपनिरीक्षक (PSI) होणार आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (MPSC) घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट 'ब' मुख्य परीक्षा 2020 अंतर्गत पोलीस उपनिरीक्षकपदाची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यात गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव येथील खुशबू प्रल्हाद बरैय्या या 25 वर्षीय युवतीने 364 गुण मिळवून पोलिस उपनिरीक्षक पदावर आपले स्थान निश्चित केले आहे. खुबशूच्या या यशाबद्दल तिचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे.
खुशबूचे वडील प्रल्हाद बरैय्या यांचे अर्जुनी शहराच्या ठिकाणी लहानसे दुकान असून ते चप्पल, जोडे शिवण्याचे काम करतात. बरैय्या यांच्या दोन खोल्यांच्या घरात पत्नी, एक मुलगा, दोन मुली असे पाचजण राहतात. प्रल्हाद बरैय्या हेच आपल्या कुटुंबाचा गाडा चालवतात. प्रल्हाद त्यांनी बारावीपर्यंत शिक्षण घेतले आहे. पत्नी आजारी असूनही मुलांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. शिक्षणाशिवाय प्रगती नाही याची जाण प्रल्हाद बरैय्या यांना वेळोवेळी होत असल्याने त्यांनी तिन्ही मुलांच्या शिक्षणात कोणतीही उणीव भासू दिली नाही. आपले मुले शिक्षण घेऊन शासकीय पदावर कार्यरत राहावे, अशी त्यांची अपेक्षा होती. आता हीच अपेक्षा खुशबूने पूर्ण केली आहे.
असं मिळवलं खुशबूने घवघवीत यश
घरामध्ये अभ्यासासाठी सोय नसतानाही खुशबूने स्वत: कष्ट करून, त्रास भोगून आणि स्पर्धात्मक परीक्षेचे कोणतेही वर्ग न लावता अभ्यास केला. एमपीएससीसाठी शहरात जाऊन अभ्यास वर्गाचाही तिने आग्रह केला नाही. सरकारी नोकरी करायची हा एकच ध्यास मनावर बिंबवून नियमित अभ्यास आणि अवांतर वाचनाच्या जोरावर खुशबूने हे यश संपादन केले. अर्जुनी मोरगाव पोलीस ठाण्याच्या वाचनालयात खुशबूने आपले यशस्वी भविष्य घडवलं आहे. नित्येनेमाने सकाळी आठ वाजता खुशबू वाचनालयात जायची. भाऊ तिला जेवणाचा डबा नेऊन द्यायचा. एकदा सकाळी वाचनालयात गेल्यावर संध्याकाळीच खुशबू घरी यायची. असा कठिण संघर्ष करत खुशबूने एमपीएससी परीक्षेमध्ये पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले.
"माझं प्राथमिक आणि माध्यमीक शिक्षण हे अर्जुनी मोरगाव येथे झाले आहे. स्पर्धा परीक्षेची माहिती मला माझ्या भावाने दिली. अभ्यास करुन आपण अधिकारी होऊ शकतो असे भावाने सांगितले होते. अर्जुनी मोरगाव येथे वाचनालय असून मी तिथे अभ्यास केला. माझे बाबा चप्पल शिवण्याचे काम करतात. चप्पल मांडीवर घेऊन त्याची ते दुरुस्ती करतात. त्यातून मिळालेल्या पैशातून त्यांनी आमचे शिक्षण केले. मला सतत वाटत होतं की आई वडिलांसाठी काहीतरी करावं. त्यानंतर मी वाचनालयात जाऊन अभ्यास सुरु केला," असे खुशबूने सांगितले.