नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यात डामरखेडा येथे राहणारे ७५ वर्षीय पदम हारचंद कोळी. घरी दारिद्य पाचवीला पुजलेले. संजय गांधी निराधार योजनेच्या मदतीवर त्यांचा घरगडा सुरु होता. आधीच घराची परिस्थिती फाटकी त्यातच पत्नीला कोरोनाची लागण झाली. पत्नीच्या उपचारात हातात असलेले दोन पैसेही खर्च झाले.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पत्नीचा आजार वाढला आणि त्या आजारातच पत्नीचं निधन झालं. होत्याचं नव्हते झाले. संसाराचा कणाच मोडून पडला. कोळी कुटुंब हवालदिल झालं. या दुःखातून सावरण्याची संधी शासनानं दिली. पत्नीचं कोरोनामुळे निधन झाल्यानं पदम कोळी यांना शासकीय योजनांमधून ५० हजारांची मदत मिळाली. 


ही मदत मिळवण्यासाठी त्यांनी अनेकांच्या पायऱ्या झिजवल्या. अखेर बँकेत ५० हजार रुपये जमा झाले. ते त्यांनी बँकेतून काढले. हे पैसे घरी नेताना पदम यांच्या डोळ्यात आनंद होता. पत्नीच्या उपचारासाठी जे गमावले त्यातून सावरण्यासाठी ही मिळालेली मदत टीमनं फार मोलाची वाटत होती. 


पैसे मिळाल्याच्या आनंदात त्यांना आपल्या नातवाची आठवण झाली. कधी काही नेलं नाही नातवाला. म्हणून त्यांनी त्याच्यासाठी खाऊ घ्यायचं ठरवलं. त्यांची पावलं दुकानाच्या दिशेनं वळली आणि हीच संधी चोरट्यानं साधली. त्यांच्या हातातील ५० हजार रुपये घेऊन तो पसार झाला. 


कधी नव्हे ते ५० हजार मिळाले आणि तेही चोरट्याने चोरून नेल्यानं त्यांच्यावर पुन्हा आभाळ कोसळलं. पुन्हा होत्याचं नव्हतं झालं. काय करावे आणि काय नाही ? अशी अवस्था त्यांची झाली. 


पदम यांची ही करून कहाणी नंदुरबारचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांना समजली. पोलीस कायदेशीर कारवाई करतीलच पण, यावेळी त्यांनी पदम यांना माणुसकीचा हात देण्याचं ठरवलं. त्यांनी पदम यांना पोलीस अधीक्षक कार्यालयात हजर करण्याचे आदेश शहादा पो.स्टे.चे पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांना दिले. 


मिळालेल्या आदेशाचं पालन करत बुधवंत आपल्या सहकाऱ्यांसह डामरखेडा गावात पोहोचले. कधी नव्हे ते पोलीस गावात आले होते. त्यांनी पदम यांची चौकशी केली. त्यामुळं गाव चिंतेत सापडला. काहींना वाटलं चोरीचे पैसे पार्ट मिळाले कि काय? पण तसं काहीच नव्हतं.      


पोलीस का आले? काय होणार? या विचारातच पदम पोलिसांच्या गाडीत बसले. नंदुरबारला पोलीस अधीक्षक कार्यालयात त्यांना नेण्यात आलं. तेथे गेल्यावर घाबरलेल्या पदम यांना सुखद धक्का बसला. 


पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी ५० हजार रुपयांची रक्कम त्यांच्या हातात ठेवली. ”तुमचे चोरीला गेलेले पैसे आम्ही शोधून देऊच. परंतु, माझ्या सहकारी पोलिसांनी तुमच्यासाठी वर्गणी काढून पैसे जमवले आहेत त्याचा स्वीकार करा” असं म्हणत खुद्द एस.पी.नी त्यांना विनंती केली.


माणुसकीच्या भावनेतून पोलिसांनी जमा केलेले हे पैसे स्विकारताना पदम यांना रडूच कोसळलं. एका वृद्धाचे लुटलेलं हे समाधान पोलिसांनी वर्गणी काढून परत केलं. यावेळी पदम यांचे भावुक झालेले डोळे पाहून उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांनाही गहिवरून आलं होतं.