पनवेल महापालिका आयुक्त सुधाकर शिंदे यांची तडकाफडकी बदली
आधी अधिकाऱ्यांच्या पाठिशी असल्याचं दाखवून मुख्यमंत्री अखेर स्थानिक नेत्यांपुढे झुकल्याचं पुढं आलंय.
पनवेल : कार्यक्षम अधिकाऱ्यांना पुन्हा आपला कार्यकाळ पूर्ण करण्यापूर्वीच बदलीला सामोरं जावं लागल्याचं आणखी एक उदाहरण समोर आलंय. पनवेल महापालिकेचे आयुक्त सुधाकर शिंदे यांची अखेर तडकाफडकी बदली करण्यात आलीय.
विशेष म्हणजे पनवेल महापालिकेतील भाजप नगरसेवकांनी आणलेला अविश्वासाचा ठराव मुख्यमंत्र्यांनी फेटाळला होता. मात्र आधी अधिकाऱ्यांच्या पाठिशी असल्याचं दाखवून मुख्यमंत्री अखेर स्थानिक नेत्यांपुढे झुकल्याचं पुढं आलंय.
भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांनीही शिंदेंच्या बदलीची मागणी केली होती. राज्य प्रशासनात तब्बल २८ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात औरंगाबाद, पुणे आणि ठाण्याच्या सनदी अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
२८ अधिकाऱ्यांच्या बदल्या...
सुधारकर शिंदे यांची आता 'महात्मा फुले जन आरोग्य योजने'च्या सीईओपदी बदली करण्यात आलीय
तर ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांची औरंगाबाद जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे
औरंगाबादचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडे आता पुणे जिल्ह्याचा कारभार सोपवण्यात आलाय
पुण्याचे जिल्हाधिकारी सौरव राव यांच्याकडे पुणे महापालिकेचा कारभार सोपवण्यात आलाय
पुण्याचे आयुक्त कुणाल कुमार यांची केंद्रात प्रतिनियुक्ती करण्यात आलीय