विष्णू बुरगे झी मीडिया बीड: मराठवाड्यात शेतमजूर महिलांच्या गर्भपिशव्या काढण्याच्या रॅकेटचा झी २४ तासनं पर्दाफाश केला. अशा पद्धतीनं गर्भपिशवी काढलेल्या महिलांनी आता आमच्या माध्यमातून तमाम महाराष्ट्रासमोर आपली कैफियत मांडली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बीड जिल्ह्यातली एक ऊसतोड कामगार महिला जिने झी 24 ताससमोर ही कैफियत मांडली आहे. वयाच्या अठराव्या वर्षी लग्न झालं आणि लगेचच उसाच्या फडात कामाला जावं लागलं. 60-60 किलो जड उसाच्या मोळ्या उचलल्यामुळे त्याचा परिणाम गर्भाशयावर झाला आणि वारंवार पोटदुखीच्या तक्रारी येऊ लागल्या. 


सुरूवातीला पोट दुखण्याकडे दुर्लक्ष केलं. कारखान्यानं आरोग्य सुविधा पुरवलेल्या नाहीत, वेळेवर अन्नपाणी नाही, उपचारासाठी पैसा नाही, त्यामुळे दुखणं वाढत गेलं. अखेर हा त्रास एवढा वाढला की गर्भपिशवी काढल्याशिवाय पर्यायच राहिला नाही.



उसाच्या अवजड मोड्या उचलल्यामुळे याचा गर्भाशयावर परिमाण होत असला तरी या समस्येच्या नावाखाली इतर महिलांनाही खासगी डॉक्टरांकडून सर्रास गंडा घातला जातो. कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराची भीती दाखवून अनेक महिलांना गर्भपिशवी काढण्याचा सल्ला डॉक्टर देतात. 


झी २४ तासनं या सर्व गोरखधंद्याचा पर्दाफाश केल्यानंतर आता या ऊसतोड महिलांमध्ये डॉक्टरांनी जागृती निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. तसंच या महिलांनीही अशा दिशाभूल करणाऱ्या डॉक्टरांपासून सावध राहण्याची गरज आहे.